मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bharat Jodo Yatra : तारीख आणि राज्यही ठरलं; शिवसेनेचा ढाण्या वाघ भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

Bharat Jodo Yatra : तारीख आणि राज्यही ठरलं; शिवसेनेचा ढाण्या वाघ भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 09, 2023 03:42 PM IST

Sanjay Raut In Bharat Jodo Yatra : आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Sanjay Raut In Bharat Jodo Yatra
Sanjay Raut In Bharat Jodo Yatra (HT)

Sanjay Raut In Bharat Jodo Yatra : दक्षिणेसह मध्य भारतातील अनेक राज्यांचा प्रवास करत काँग्रेसची भारत जोडो यात्रा हरयाणातील कुरुक्षेत्रमध्ये पोहचली आहे. यावेळी माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांच्यासोबत अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधींना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रेत दाखल झाले होते. त्यानंतर आता संजय राऊत उत्तरेत जाऊन भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १९ जानेवारीला काँग्रेसची भारत जोडो यात्रा पंजाब आणि जम्मू-काश्मिरच्या सीमाभागात पोहचणार आहे. त्यावेळी १९ जानेवारीलाच संजय राऊत पंजाबमध्ये जाऊन भारत जोडो यात्रेत पदयात्रा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे सहकारी खासदारही सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत पहिल्यांदाच राहुल गांधींची भेट घेणार असल्यामुळं आता शिवसेना आणि काँग्रेसमधील संबंध आणखी दृढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमधील लाल चौकात समारोप होणार असून तिथंही संजय राऊत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर संजय राऊतांना पत्राचाळ प्रकरणात जामीन मिळाला होता. त्यावेळीच राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे हिंगोलीत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन राहुल गांधींची भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पंजाबमध्ये जाऊन भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

IPL_Entry_Point