Sanjay Raut attacks Narendra Modi : ‘पंडित नेहरू यांचा मृत्यू होऊन ६० वर्षे झाली तरी त्यांचं नाव आज निघतंय. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी वारंवार त्यांच्या नावाचा जप करत आहेत. पण नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधानपदावरून पायउतार होतील तेव्हा त्यांची आठवणही कुणाला राहणार नाही,’ अशी जळजळीत टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज केली.
ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेस राजवटीतील चुका अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. त्यावर राऊत यांनी अत्यंत बोचरी प्रतिक्रिया दिली.
'पंडित नेहरू यांच्यावर होणारी टीका हे खरंतर त्यांच्या कार्याचं यश आहे. इतकी वर्षे झाली, नरेंद्र मोदी सतत त्यांच्या नावाचा जप करतात. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील तेव्हा कुणी त्यांचं स्मरणही करणार नाही, असं राऊत म्हणाले.
'भारतीय जनता पक्षाला आजही काँग्रेसची भीती वाटते. काँग्रेस हे भाजपपुढं आव्हान आहे. भाजपला इंडिया आघाडीची भीती वाटते हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला त्यांच्या हिंमतीवर ४०० जागा मिळणार आहेत. असं हेच लोक सांगत आहेत. मग गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसवर टीका करता? ५० वर्षांपूर्वीचा इतिहास तोडून-मोडून का सांगता? तुम्हाला निवडून दिलंय ना, मग तुम्ही केलेल्या कामांविषयी, विकासाविषयी बोला ना. नेहरूंनी जे केलं त्याच्या ५ टक्के तरी करून दाखवा, असं राऊत यांनी सुनावलं.
'राज्यसभेत मोदींनी केलेलं भाषण हे पंतप्रधानांचं वाटतच नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात मणिपूरचा उल्लेख कुठं आला नाही. काँग्रेसमुळं देश दुभंगलाय असं ते सांगत होते. मणिपूरचं काय झालंय? मणिपूरही दुभंगलंय. त्या राज्याविषयी तुमच्या मनात अजिबात वेदना नसावी? काश्मिरी पंडितांविषयी मोदी एक शब्द बोलले नाहीत, याची आठवणही राऊत यांनी दिली.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शाहू महाराज यांचं नाव पाठवावं असा प्रस्ताव काही लोकांनी आमच्याकडं दिला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान असलेली व्यक्ती त्या जागेवर जावी असं आमचंही मत आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल, असं संजय राऊत राज्यसभेच्या निवडणुकीविषयी बोलताना म्हणाले.
संबंधित बातम्या