विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया (I.N.D.I.A) आघाडीला शह देण्यासाठी भाजपच्या नेतृत्त्वातील सरकारने संविधानातून इंडिया नाव वगळून भारत हे नाव पुढे केला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. भारत विरुद्ध इंडिया नावावरून वाद सुरू असतानाच काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी विरोधकांच्या आघाडीला नवे नाव सुचवलं आहे. त्यांनी BHARAT चा फुलफॉर्म सादर केला आहे.
थरूर यांनी म्हटले की, कदाचित यामुळे भारतीय जनता पार्टी यानंतर नाव बदलण्याचा खेळ बंद करेल. असे म्हटले जाते की, सरकार पाच दिवसांच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात देशाचे नाव बदलण्याचे विधेयक सादर करू शकते. दरम्यान अजूनपर्यंत अधिवेशनाचा अजेंडाही समोर आलेला नाही.
सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'X' वर थरूर यांनी लिहिले आहे की, आम्ही स्वत:ला अलायंस फॉर Betterment, Harmony And Responsible Advancement for Tomorrow (BHARAT) म्हणू शकतो. कदाचित यानंतर सत्तारूढ पक्ष नाव बदलण्याचा खेळ बंद करेल. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विरोधी आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूसिव्ह अलायंस म्हणजेच I.N.D.I.A नाव देण्यात आले आहे.
नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध-
काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी इंडिया नाव हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती भवनने ९ सप्टेंबर रोजी आयोजित जी २० डिनरसाठीच्या निमंत्रण पत्रात 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत' नाव देण्यात आले आहे. भारतीय संविधानात भारत म्हणजेच इंडिया, राज्यांचा संघ असेल, असे नमूद आहे. आता राज्यांच्या संघावरच हल्ले केले जात आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ९ सप्टेंबर रोजी रात्र भोजनाचे आयोजन केले आहे. या आमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर हा देशाच्या नामांतराचा घाट आहे का अशी पहिली शंका काँग्रेसने घेतली. त्यानंतर इतर राजकीय पक्षांनी, विचारवंतांनी, खेळाडूंपासून कलाकार, सामान्य नागरीक अशा विविध घटकांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. आता यावरून अनेक तर्क लावले जात आहेत.