Shashi Tharoor News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर बागेत पेपर वाचत बसले असताना एका माकडाशी अनोख्या पद्धतीने भेट झाली. ही घटना बुधवारी (४ डिसेंबर) घडली. शशी थरुर यांनी एक्सवर फोटो शेअर करून माहिती दिली आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजी भाषेच्या शब्दसंग्रहामुळे नेहमीच चर्चेत असतात, पण बुधवारी त्यांना त्यांच्या घरी एका माकडासोबत असा विचित्र अनुभव आला की तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. थरूर आपल्या दिल्लीतील निवासस्थानी खुर्चीवर बसून वृत्तपत्र वाचत असताना एक माकड तेथे आले आणि त्यांच्या छातीला चिकटले. यावेळी थरूर यांनी माकडाला खाऊ घालण्यासाठी केळीही दिली, त्यानंतर ते छातीवर डोके टेकवून झोपले.
काँग्रेस खासदाराने 'एक्स'वर माकडाशी झालेल्या भेटीचे फोटो शेअर करत आपले अनुभव कथन केले. 'आजचा अनुभव विलक्षण होता. आज सकाळी मी माझ्या राहत्या घराच्या बागेत बसून वर्तमानपत्र वाचत असताना एक माकड वर आले, सरळ माझ्याजवळ येऊन माझ्या मांडीवर बसले. मी त्याला दोन केळी दिली जी त्याने खाल्ली. त्याने मला मिठी मारली आणि माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपी गेले. मी हळूहळू उठू लागलो, तो उडी मारून निघून गेला.
शशी थरूर पुढे लिहितात, 'वन्यप्राण्यांविषयी आदर आपल्यात अंतर्भूत आहे. माकड चावण्याच्या जोखमीबद्दल मला थोडी काळजी वाटत होती (ज्यासाठी रेबीजची लस घेणे आवश्यक होते), तरीही मी शांत राहिलो आणि त्याच्या उपस्थितीचे धोक्यापासून मुक्त होऊन त्य़ाचे स्वागत केले. मला समाधान आहे की माझा विश्वास खरा सिद्ध झाला आहे आणि आमची बैठक पूर्णपणे शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण होती. थरूर यांनी अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात माकड छातीला चिकटलेले दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
थरूर यांच्या पोस्टवर युजर्स कमेंट करत असून अनेकांनी त्यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. काही तासांतच या पोस्टला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. एका युजरने लिहिले की, हे आमचे पूर्वज आहेत सर. तर आणखी एका युजरने गंमतीशीप कमेंट करत म्हटले की, त्याला कदाचित तुमच्याकडून इंग्रजी शिकायचे असेल. आणखी एका युजरने थरूर आणि माकडाचा फोटो शेअर करत लिहिले की, शब्दांशिवाय प्रेम व्यक्त केले जाऊ शकते. या पोस्टवर अनेक युजर्सनी दिलखुलास स्माईलीही तयार केल्या आहेत.
संबंधित बातम्या