मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  यूएनमधील नोकरीचा राजीनामा देऊन मंत्री झाले, पण अध्यक्षपद हुकलं; वाचा शशी थरूर यांचा राजकीय प्रवास

यूएनमधील नोकरीचा राजीनामा देऊन मंत्री झाले, पण अध्यक्षपद हुकलं; वाचा शशी थरूर यांचा राजकीय प्रवास

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 19, 2022 04:47 PM IST

Political Journey Of Shashi Tharoor : कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. त्यात सोनिया गांधींचे निकटवर्तीय मल्लिकार्जुन खर्गेंनी शशी थरुर यांचा दारुण पराभव केला आहे.

Congress presidential candidate Dr Shashi Tharoor
Congress presidential candidate Dr Shashi Tharoor (HT)

Political Journey Of Shashi Tharoor : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे इंग्लिशमॅन खासदार शशी थरुर यांचा आज दारुण पराभव झाला आहे. सोनिया गांधींचे निकटवर्तीय मल्लिकार्जुन खर्गेंनी त्यांना तब्बल ६८२५ मतांनी हरवत अध्यक्षपद जिकलं आहे.त्यामुळं आता कॉंग्रेसमधील अनेक नेते आणि पदाधिकारी अजूनही गांधी घराण्यासोबतच असल्याचं सिद्ध झालं आहे. परंतु या निवडणुकीत हरलेले शशी थरुर कोण आहेत, त्याची राजकीय कारकिर्द कशी राहिलेली आहे, जाणून घेऊयात.

कोण आहेत शशी थरुर?

शशी थरुर यांचा जन्म वृत्तपत्रात काम करणाऱ्या चंद्रन थरुर यांच्या कुटुंबात झाला होता. चंद्रन हे अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले होते, परंतु शशी यांच्या जन्मानंतर त्यांचं कुटुंब भारतात परतलं. थरुर यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. इंग्रजीवर पकड असल्यानं थरुर यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केवळ २२ व्या वर्षी पीएचडी पूर्ण केली. त्यावेळी त्यांचं नाव अमेरिकेत चांगलंच गाजलं होतं.

थरुर यांची यूएनमधील कारकिर्द...

अमेरिकेत पीएचडीचं शिक्षण घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या यूएनएचसीआरच्या स्टाफ मेंबरपदी शशी थरुर यांची नियुक्ती झाली. त्यावेळ व्हिएतनाममधील संकटात लोकांना वाचवण्यात शशी थरुर यांनी मोठं योगदान दिलं होतं. त्यानंतर १९८५ साली ते यूएनएचसीआरचे ते उपाध्यक्ष झाले. १९९० साली त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सेक्रेटरींचा विशेष सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आलं. कोणत्याही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की वाद मिटवण्यासाठी यूएननं स्थापन केलेल्या पीस किपिंग कमिटीत थरुरांना स्थान देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी युगोस्लावियातील गृहयुद्ध शमवण्यात मोठी भूमिका बजावली होती. २००७ साली त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदाची निवडणूक लढवली परंतु दक्षिण कोरियाच्या बान की मून यांनी त्यांचा पराभव केला. त्यांना जिंकवण्यासाठी तात्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही प्रयत्न केले होते. परंतु या निवडणुकीतील पराभवानंतर थरुर यांनी यूएनमध्ये तब्बल २९ वर्ष काम केल्यानंतर नोकरीचा राजीनामा देत दुबईतील एका गुंतवणूक कंपनीत हेड म्हणून काम करायला सुरुवात केली.

कॉंग्रेसनं संधी दिली आणि थरुर मंत्री झाले...

यूएनमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दुबईत आलेल्या शशी थरुरांना कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी राजकारणात येण्यासाठी गळ घातली. त्यावेळी थरुर राजकारणात येण्यासाठी तयार झाले. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकीटावर थरुर तिरुवनंतपूरममधून पहिल्यांदा खासदार झाले आणि केंद्रात मंत्रीही. परंतु केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्येच राहणं पसंत केल्यानं अनेकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती.

सुनंदा पुष्कर प्रकरणात अडचणीत...

शशी थरुर यांच्या दुसऱ्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यूनंतर शशी थरुरांवर अनेक आरोप करण्यात आले होते. अनेकदा तपास यंत्रणांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. परुंतु त्यामधूनही ते निर्दोष सुटले. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘मी हिंदू का आहे?’ आणि ‘द पॅरॉडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’, या पुस्तकांवरून मोठा राजकीय वाद झाला होता.

इंग्लंडच्या संसदेत इंग्रजांना सुनावलं...

एकदा शशी थरुर इंग्लंडच्या संसदेला संबोधित करत होते, तेव्हा त्यांनी ब्रिटिश साम्राज्यवादावर सडकून टीका केली होती. 'इंग्रजांच्या सत्तेचा सूर्य कधीही मावळला नाही, परंतु सत्ताकाळाळात इंग्रजांनी इतर देशांची केवळ लूट केली', असं वक्तव्य करत थरुर यांनी इंग्रजांना त्यांच्या संसदेत सुनावलं होतं. याशिवाय जर इंग्रज भारतात आले नसते तर संपूर्ण भारतावर मराठ्यांचं राज्य असतं, असंही थरुर म्हणाले होते.

सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय राजकारणी...

ट्विटरवर सर्वात आधी दहा हजार आणि एक लाख फॉलोवर्स असलेले थरुर पहिले भारतीय राजकारणी आहेत. याशिवाय २०१३ पूर्वी म्हणजे मोदींच्या सत्तेत येण्यापूर्वी ते सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असलेले राजकारणी होते.

अनेक महिलांशी थरुर यांचं नाव जोडलं गेलं...

पहिल्या पत्नीपासून थरुर यांना दोन जुळे मुलं आहेत. परंतु पत्नीसोबत झालेल्या मतभेदानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर थरुरांनी सुनंदा पुष्कर यांच्याशी लग्न केलं. परंतु त्यांचाही संशयास्पदरित्या मृ्त्यू झाल्यानंतर शशी थरुरांचा नाव आजही अनेक महिलांशी जोडलं जातं. त्यात पाकिस्तानच्या महिला खासदारासह अनेक विदेशी महिलांचा समावेश आहे. परंतु थरुर यांनी या विषयावर कधीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

IPL_Entry_Point