मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Share Market: शेअर बाजारात तेजी, चार महिन्यांनंतर सेन्सेक्स पुन्हा ६० हजार पार

Share Market: शेअर बाजारात तेजी, चार महिन्यांनंतर सेन्सेक्स पुन्हा ६० हजार पार

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 17, 2022 12:53 PM IST

Share Market: गेल्या काही महिन्यात रशिया-युक्रेन युद्ध आणि महागाई यामुळे शेअर बाजारात सातत्याने घसरण दिसत होती. जवळपास १० हजार अंकांनी सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती.

Share Market
Share Market (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Share Market: सध्या शेअर बाजारात तेजी दिसत असून सेन्सेक्सने (Sensex) ४ महिन्यांनी पुन्हा ६० हजारचा टप्पा ओलांडला आहे. शेअर बाजाराच्या सुरवातीला सेन्सेक्सने तासाभराताच दीडशेहून अधिक अंकांनी उसळी घेत ६० हजारांचा आकडा ओलांडला. गेल्या काही महिन्यात रशिया-युक्रेन युद्ध आणि महागाई यामुळे शेअर बाजारात सातत्याने घसरण दिसत होती. जवळपास १० हजार अंकांनी सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती. पण दोन महिन्यात शेअर बाजारात सकारात्मक असं चित्र निर्माण झालं आहे.

बुधवारी बाजाराने उसळी घेत पुन्हा एकदा ४ महिन्यांनी ६० हजारांचा आकडा गाठला. सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची वाढ होऊन तो ६० हजार १५० च्या वर गेला, तर निफ्टीत (Nifty) १०० अंकांची वाढ झाल्याने तो १७ हजार ९०० वर पोहोचला. बँक निफ्टीत (Bank Nifty) ७५ पेक्षा जास्त अंकांची वाढ झाली असून तो ३९ हजार ३०० च्या वर आहे.

बाजारात तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजार भांडवल हे २७१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ११ जुलै रोजी हेच बाजार भांडवल २५३ लाख रुपये इतके होते. महिन्याभरात यामध्ये २० लाख कोटींची वाढ झाल्यानं गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची वाढ झाली होती. तर निफ्टी १३३ अंकांनी वधारला होता. सेन्सेक्समधील वाढ ०.६७ टक्के इतकी होती. तो ५९ हजार ८६३ अंकावर स्थिरावला होता. तर निफ्टीत ०.७६ टक्क्यांची वाढ होऊन तो १७ हजार ८३१ अंकांवर होता.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग