Shaikh Hasina : 'शेख हसीना या आजही बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. त्यांनी अधिकृतरित्या राजीनामा दिलेला नाही,' असा दावा त्यांचे चिरंजीव साजिब वाजेद यांनी केला आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला होता. हजारोंचा जमाव पंतप्रधानांच्या घरावर चालून आला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर शेख हसीना यांनी तिथून पलायन केलं होतं. त्या सध्या भारतात वास्तव्यास आहेत. त्यांना कोणता देश आश्रय देणार हे अद्याप ठरलेलं नाही. दरम्यानच्या काळात बांगलादेशात अर्थतज्ज्ञ युनुस मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं आहे.
असं असताना आता शेख हसीना यांच्या मुलानं वेगळाच दावा केला आहे. त्यामुळं घटनात्मक पेच उभा राहण्याची शक्यता आहे. साजिब वाजेद यांच्या म्हणण्यानुसार, आईनं देश सोडला तेव्हा परिस्थिती अत्यंत बिकट होती. तिला राजीनामा द्यायला पुरेसा वेळही मिळाला नाही. त्यामुळं ती अधिकृतरित्या राजीनामा देऊ शकली नाही. त्याआधीच तिला भारतात यावं लागलं.
'तांत्रिकदृष्ट्या शेख हसीना अजूनही पंतप्रधान आहेत. जाहीर निवेदन देऊन नंतर राजीनामा देण्याचा आईचा विचार होता. पण तोपर्यंत आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते. आमच्याकडं वेळच उरला नव्हता. आईनं तिचं सामान पॅकही केलं नाही. राज्यघटनेतील तरतुदीनुसार पाहिलं तर ती अजूनही बांगलादेशची पंतप्रधान आहे, असं वाजेद म्हणाले.
पंतप्रधानांच्या औपचारिक राजीनाम्याशिवाय काळजीवाहू सरकारच्या स्थापनेला अर्थ नाही. त्यास न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. सध्या परिस्थितीत राज्यघटनेतील तरतुदीनंतर तीन महिन्यांत निवडणूक होणं अपेक्षित आहे. तसं झाल्यास अवामी लीग निवडणूक लढवेल आणि पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ता न आल्यास आम्ही विरोधात बसू, पण पक्ष पुनरागमन करेल, असं ते म्हणाले.
आगामी निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात व्हाव्यात व देशात पुन्हा लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) सोबत काम करण्याची आमची तयारी आहे, असं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहात का असं विचारलं असता वाजेद म्हणाले, 'असंही या कार्यकाळानंतर निवृत्त होण्याचा निर्णय आईनं घेतला होता. पक्षाची इच्छा असेल तर मी सक्रियपणे काम करायला तयार आहे, असं वाजेद म्हणाले.
माझी आई अटकेला कधीच घाबरलेली नाही. तिनं काहीही चुकीचं केलेलं नाही. तिच्या सरकारमधील काही लोकांनी बेकायदेशीर गोष्टी केल्या. याचा अर्थ हे सगळं तिच्या आदेशानं झालं असं नाही. त्या सर्व गोष्टींसाठी माझी आई जबाबदार आहे असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.