शाहबाज शरीफ यांच्या पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे. पंतप्रधान निवडणुकीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीमध्ये मतदान पार पडले. नॅशनल असेंबलीचे स्पीकर अयाज सादिक यांनी मतदानाची निकाल जाहीर केला. अयाज सादिक यांनी निकालाची घोषणा करताना म्हटले की, शाहबाज शरीफ २०१ मते मिळवून दुसऱ्यांदा पंतप्रधान निवडण्यात आले आहे. तीन वेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिलेले शाहबाज शरीफ २०२२ मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधानमंत्री बनले होते. पंतप्रधान म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ १६ महिन्यांचा होता.
शाहबाज शरीफ यांना एकूण २०१ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी पीटीआयचे उमर अयुब खान यांना केवळ ९२ मते मिळाली. यानंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शेहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शाहबाज शरीफ सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. यानंतर नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनने, पीपीपी आणि एमक्यूएम यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आज अखेर पाकिस्तानला नवे सरकार मिळाले आहे. शाहबाज शरीफ, हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. इम्रान खान यांच्या राजीनाम्यानंतर शाहबाज शरीफ यांनी एप्रिल २०२२ मध्ये पंतप्रधान बनले होते. ऑगस्ट २०२३ पर्यंत ते यापदावर होते.
पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच १०० च्या आसपास अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा चालू होती. आघाडीवर एकमत झाल्यानंतर पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ (७२) यांची दुसऱ्यांदा घोषणा करण्यात आली आहे. ३३६ सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात दोन्ही पक्षांचे २०१ सदस्य आहेत.