Delhi New Born Baby Care Hospital Fire : राजधानी पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील दिल्ली न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलला शनिवारी रात्री नवजात बालकांच्या खासगी रुग्णालयात भीषण आग लागली. या भीषण आगीत ७ मुलांचा होरपळून मृत्यू झाला. तर इतर ५ नवजात बालके गंभीर आहेत. काल गुजरात येथे एका गेमझोनमध्ये आग लागल्याने ३० पेक्षा अधिक मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दिल्लीत देखील या रुग्णालयाला आग लागल्याने ७ मुलांचा नाहक जीव गेला. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही.
दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) कडून मिळालेल्या माहितीनुसार, विवेक विहार येथील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एकूण १२ मुलांना वाचवले. यापैकी ७ गंभीर भाजलेल्या नवजात बालकांचा मृत्यू झाला होता तर इतर ५ नवजात बाळकांची प्रकृती ही गंभीर आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे.
आगीची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अग्निशमन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. घटनास्थळावरून सुटका करण्यात आलेल्या नवजात बालकांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली अग्निशमन सेवेने सांगितले की, आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून बचावकार्य सुरू आहे. डीएफएस प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, मध्यरात्री एक फोन आला होता. आगीचे कारण कळू शकलेले नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री ११.३० च्या सुमारास विवेक विहार पोलिस स्टेशनला एका रुग्णालयात आग लागल्याचा पीसीआर कॉल आला होता. कॉल मिळताच विवेक विहारचे एसीपी आणि एसएचओ तात्काळ पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले, जेथे न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटल आणि शेजारील इमारतीला आग लागल्याचे दिसले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या वरच्या मजल्यावरून इतर लोकांच्या मदतीने ११ नवजात बालकांची सुटका करण्यात आली आणि रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पूर्व दिल्ली प्रगत एनआयसीयू हॉस्पिटल, डी-२३७, विवेक विहार येथे उपचारासाठी हलवण्यात आले. ही तीन मजली इमारत असून आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.