Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाला मोठं यश; चकमकीत ७ नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाला मोठं यश; चकमकीत ७ नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त

Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाला मोठं यश; चकमकीत ७ नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त

Published May 23, 2024 09:17 PM IST

सुरक्षा दल आणि नारायणपूर, बस्तर आणि दंतेवाडा येथील पोलिस दलाने सुरू केलेल्या संयुक्त कारवाईत ७ नक्षलवादी ठार झाले. यात ७ शस्त्रे जप्त केली.

छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाला मोठं यश; चकमकीत ७ नक्षलवादी ठार (Representative Photo)
छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाला मोठं यश; चकमकीत ७ नक्षलवादी ठार (Representative Photo)

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील जंगलात गुरुवारी सुरक्षा दल आणि नारायणपूर, बस्तर आणि दंतेवाडा येथील पोलिस दलाने सुरू केलेल्या संयुक्त कारवाईत ७ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी ७  शस्त्रे आणि इतर नक्षली साहित्य जप्त केले असून सायंकाळी उशिरापर्यंत चकमक सुरू होती. मृत माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

नारायणपूर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विजापूर आणि नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली. बस्तर, नारायणपूर आणि दंतेवाडा येथील सुमारे १ हजार सुरक्षा रक्षक या मोहिमेत गुंतले होते.

सीपीआय (माओवादी) च्या प्लाटून क्रमांक १६ मधील माओवादी नेते आणि इंद्रावती एरिया कमिटीच्या सदस्यांच्या गुप्त माहितीनंतर नारायणपूर, बस्तर आणि दंतेवाडा येथील जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांचे संयुक्त पथक बुधवारी रात्री नक्षलविरोधी मोहिमेवर रवाना झाले. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास गोळीबार सुरू झाला. गोळीबार थांबल्यानंतर नारायणपूर पोलिसांनी दोन माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले.

नारायणपूर, बस्तर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या ट्रायजंक्शनवरील अबूझमाड जंगलात ही कारवाई करण्यात येत  आहे. नारायणपूर पोलिसांनी सकाळी दोन मृतदेह ताब्यात घेतले, तर सायंकाळी दंतेवाडा पोलिसांनी पोलिस उपअधीक्षक राहुल उईके आणि डीएसपी आशिष नेताम यांच्या नेतृत्वाखाली पाच मृतदेह ताब्यात घेतले. पाच शस्त्रे ही जप्त करण्यात आली आहेत, परंतु शस्त्रांची श्रेणी अद्याप समजू शकलेली नाही, असे राय यांनी सांगितले. नारायणपूर पोलिसांनी दोन हत्यारे जप्त केली.

महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दरम्यान पसरलेल्या अबूझमाद या सहा हजार चौरस किलोमीटर घनदाट जंगलाचे ब्रिटिश काळापासून सर्वेक्षण झाले नसल्याने त्याला 'अननोन हिल' म्हणून ओळखले जाते.

हे जंगल माओवादी कारवायांचे केंद्र बिंदू असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी) सुमारे डझनभर वरिष्ठ कार्यकर्ते अजूनही तेथे तळ ठोकून असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सध्याच्या चकमकीसह या वर्षी सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या चकमकीत आतापर्यंत ११२ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जे २०२३ च्या तुलनेत खूप जास्त आहे, ज्यात केवळ २२ माओवादी मारले गेले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर