आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. याआधी शुक्रवारी एनटीआर जिल्ह्यात ८ कोटी रुपये जप्त केले होते. ताजी घटना राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आहे. शनिवारी छोटा हत्ती वाहनातून तब्बल ७ कोटींची रक्कम नेली जात होती. नल्लाजर्ला परिसरातील अनंतपल्लीमध्ये एका ट्रकच्या धडकेत टाटा ऐस (TATA ACE) वाहन पलटले आणि रस्त्यावर नोटांच्या थप्प्या पाहायला मिळाल्या.
स्थानिक लोकांनी पाहिले की, पलटलेल्या वाहनात नोटांची बंडले होती. एका बॉक्समध्ये ७ कोटींची रक्कम नेली जात होती. ही घटना तेव्हा झाली जेव्हा वाहन विजयवाडाहून विशाखापट्टमकडे जात होते. या अपघातात टाटा ऐस वाहनाचा चालक जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
याआधी शुक्रवारीही आंध्र प्रदेशमधील एनटीआर जिल्ह्यातही मोठी रोकड जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी येथे चेकिंगच्या दरम्यान पाइप वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून ८ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. पोलिसांनी ट्रक आणि पैसे जप्त करत दोन लोकांना अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, नोटांचे बॉक्स एनटीआर जिल्ह्यातील गरिकापाडू चेक पोस्टवर चेकिंगवेळी पकडले गेले. सांगितले जात आहे की, पैसे पाइप वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या केबिनमध्ये होते. ही रक्कम हैदराबादहून गुंटूरकडे नेली जात होती. पोलिसांनी सांगितले की, पुढील कारवाई निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि फ्लाइंग स्क्वाड टीम करेल.
आंध्र प्रदेशमधील सर्व २५ जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या जागांवर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये अराकू, श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टनम, अनकापल्ली, काकिनाडा, अमलापुरम, राजमुंदरी, नरसापुरम, एलुरु, मछलीपट्टनम, विजयवाड़ा, गुंटूर, नरसारावपेट, बापटला, ओंगोल, नांदयाल, कर्नूलु, अनंतपुर, हिंदूपुर, कडपा, नेल्लोर, तिरुपती (राखीव), राजमपेट आणि चित्तूर आदी जागांचा समावेश आहे.