Niti Aayog Meeting : नीती आयोगाच्या बैठकीवर सात मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार, सीएम शिंदे दिल्लीत दाखल
Niti Aayog Meeting : पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीवर सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला आहे.
Niti Aayog Meeting News Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत नीती आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. त्यासाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल दिल्लीत दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे. या बैठकीत अनेक राज्यांतील पायाभूत सुविधा, गुंतवणूक, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणा या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. परंतु आता देशातील सहा मुख्यमंत्र्यांनी निती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार घातल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशाच्या नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घातल्यानंतर आता नीती आयोगाच्या बैठकीवरही विरोधकांनी बहिष्कार घातला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नीती आयोगाची बैठक आणि त्यानंतर उद्या होणाऱ्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यालाही विरोधी नेते हजर राहणार नसल्यामुळं भाजपाची अडचण होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यामुळं तेही नीती आयोगाच्या बैठकीला हजर राहणार नसल्याची माहिती आहे.
दिल्लीतील प्रसिद्ध प्रगती मैदानावर पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले आहे. तसेच भाजपा आणि भाजपशी संलग्न असलेल्या पक्षांचे प्रमुख आणि मुख्यमंत्री देखील नीती आयोगाच्या बैठकीत सामील झाले आहे. त्यामुळं नीती आयोगाच्या बैठकीतून पीएम मोदी कुणावर निशाणा साधतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.