Indian Ex Navy Officers Released from qatar : कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नौदलाचे आठ माजी कर्मचारी कतारहून भारतात परतले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतारच्या न्यायालयाने अल दाहरा ग्लोबल प्रकरणात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु, यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने केलेल्या मुसद्देगिरीमुळे सर्व जणांची शिक्षा कमी करण्यात आली असून त्यांना पुन्हा परत भारतात सोडण्यात आले आहे.
या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन जारी करण्यात आले, 'कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीत काम करणाऱ्या ८ भारतीय नागरिकांची सुटका केल्याने भारत सरकार कतारच्या या निर्णयाचे स्वागत करते. ८ पैकी ७ भारतात परतले आहेत.
कतारमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या ८ भारतीयांत कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णांदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश यांचा समावेश आहे. यापूर्वी कतार न्यायालयाने फाशीच्या शिक्षेविरोधात भारत सरकारने दाखल केलेले अपील मान्य केले होते.
अल दहराह कृत्य करणाऱ्या भारतीय नागरिकांना ऑगस्ट २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. हेरगिरीच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. या माजी नौदलाच्या कर्मचाऱ्यांना २६ ऑक्टोबर २०२३ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी भारताने हा धक्कादायक आणि एकतर्फी निर्णय असल्याचे म्हटले होते. या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबींचा शोध घेऊन न्यायालयीन लढा देण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबई येथे आयोजित COP28 शिखर परिषदेत कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेतली होती. त्यादरम्यान त्यांनी द्विपक्षीय भागीदारी आणि कतारमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या हितासंदर्भात चर्चा देखील करण्यात आली होती.
संबंधित बातम्या