नवीन संसद भवन इमारतीचे उदघाटन देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे की राष्ट्रपतींच्या या मुद्दावर सत्ताधारी भाजप आणि तमाम विरोधकांदरम्यान रणकंदन सुरू आहे. विरोधकांनी संसद भवन इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल ९०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन संसद भवन इमारतीच्या आतील वैशिष्ट्यांबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. नवीन इमारतीत खासदारांची आसन संख्या वाढवण्यात आली असून लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ठेवण्यात येणारे ‘सेंगोल’ या नवीन वैशिष्ट्याचा समावेश करण्यात आला आहे.
काय आहे ‘सेंगोल’?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘सेंगोल’बद्दल आज नवी दिल्लीत पत्रकारांना माहिती दिली. येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवना इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे सरकारकडून निश्चित झाले आहे. या इमारतीच्या आत लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ एक राजदंड सदृष्य ‘सेंगोल’ ठेवला जाणार आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिश सत्तेकडून स्वतंत्र भारताकडे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडायची होती. त्यावेळी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया काय असणार असा प्रश्न तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन यांनी सी राजगोपालचारी यांना विचारला होता. तेव्हा राजगोपालाचारी यांनी तमिळनाडूमध्ये असलेल्या ‘सेंगोल’च्या परंपरेविषयी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर तमिळनाडून ‘सेंगोल’ दिल्लीत आणण्यात आलं होतं. संपदेने संपन्न असा सेंगोलचा अर्थ होतो. सेंगोलबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळल्यानंतर त्याची चौकशी करून लोकसभा अध्यक्षांजवळ तो ठेवण्याचा निर्णय झाला, असं अमित शाह म्हणाले. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील संग्रहालयात ठेवलेलं ‘सेंगोल’ आता संसदेच्या नवीन इमारतीत आणून ठेवण्यात येणार आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवन इमारत देशाला समर्पित होईल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या ‘सेंगोल’चा स्वीकार करतील आणि लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ठेवतील, असं शाह म्हणाले.
एका ऐतिहासिक परंपरेचं पुनरुज्जिवन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे शाह म्हणाले. संसद भवन इमारतीच्या बांधकामात सामील मजुरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे