Bharant Band Viral Video : देशभरात अनेक ठिकाणी आज भारत बंदचा परिणाम दिसून येत आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी हा बंद घोषित केला होता. या बंद दरम्यान, बिहारमधील अनेक जिल्ह्यात आंदोलक रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते. या बंदमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. बिहारची राजधानी पाटणा येथेही आंदोलक हिंसक झाले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठी चार्ज केला. मात्र, पोलिसांनी आंदोलक समजून चक्क डेप्युटी कलेक्टरलाचं लाकडी दांडक्याचा प्रसाद दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाटना येथील डाक बंगला चौकात आंदोलक जमले असल्याचं दिसत आहे. या आंदोलकांना चौकातून पळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अनेक पोलिसांनी नागरिकांना मारण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीसांसोबत ड्युटीवर असलेले डेप्युटी कलेक्टर श्रीकांत कुंडलिक खांडेकर हेही आंदोलकांना तेथून हटवण्यात व्यस्त होते. तेवढ्यात एका पोलिसाने डेप्युटी कलेक्टर यांना आंदोलक समजून काठीने बदडलं. डेप्युटी कलेक्टरला मारहाण केल्याने तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेत मारहाण करणाऱ्या पोलीसाला थांबवत बाजूला केलं अचानक काठीचा फटका बसल्याने डेप्युटी कलेक्टर खांडेकर यांना देखील धक्का बसला. तेही लगेच मागे वळले आणि डेप्युटी कलेक्टर असल्याचं सांगू लागले. काही क्षणातच पोलिसांना आपली चूक लक्षात आली.
भारत बंद दरम्यान पाटण्यातील निदर्शनाची अनेक व्हिडिओ पुढे आले आहे. या निदर्शनामुळे गोळा रोड ते नेहरू पथ उड्डाणपुलापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. एक लेन पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच बायपास बेऊर वळणावर टायर जाळून निदर्शने करण्यात आली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
बायपास सिपारा पुलाजवळ शांतता होती. आंदोलक डाक बंगला चौकात पोहोचल्यावर दोन लेन पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. यानंतर डाक बंगला चौकात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. दरम्यान, पाटणाचे डेप्युटी कलेक्टरला श्रीकांत कुंडलिक खांडेकर यांनाही डाक बंगला चौकात मारहाण पोलिसांनी मारहाण केली.
पाटणा जिल्हा प्रशासनाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, भारत बंद दरम्यान डाकबंगला चौकात आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. जमाव हाताळत असताना उपविभागीय अधिकारी, पाटणा सदर, एका पोलिस अधिकाऱ्याने गैरसमजातून लाठीचार्ज केला. ही मानवी चूक असल्याचे सांगून उपविभागीय अधिकाऱ्यांनी हवालदारावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले आहे.