Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातून एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेने वारंवार पोट दुखायचे म्हणून दवाखाना गाठला, तिथे डॉक्टरांनी तिला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. मात्र, सीटी स्कॅन केल्यानंतर या महिलेचे पोट का दुखत आहे, यामागचे कारण समजल्यानंतर डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. दोन वर्षांपूर्वी या महिलेचे ऑपरेशन झाले, त्यावेळी संबंधित डॉक्टरांनी तिच्या पोटात ऑपरेशन टूल सोडल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कमला देवी (वय, ४२) असे संबंधित महिलेचे नाव असून त्या भिंड जिल्ह्यातील मेहगाव तालुक्यातील सौदा गावची रहिवासी आहेत. कमला देवी हिच्यावर २० फेब्रुवारी २०२२ रोजी म्हणजेच सुमारे दोन वर्षांपूर्वी कमला राजा रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. मात्र, अचानक पोटदुखीचा त्रास वाढल्याने त्यांनी रुग्णालय गाठले आणि सीटी स्कॅन केले.
सीटी स्कॅनचा रिपोर्ट आल्यानंतर असे समजले की, दोन वर्षांपूर्वी केलेल्या शस्त्रक्रियादरम्यान कमला यांच्या पोटात कात्री राहून गेली. पण त्यावेळी कमला यांना कोणताही त्रास जाणवला नाही. पण गेल्या काही महिन्यापासून पोटदुखीचा त्रास वाढल्याने कमला यांनी भिंड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्याचे ठरवले. त्यावेळी सीटी स्कॅन केले असता कमला यांच्या पोटात कात्री आढळून आली, जी वैद्यकीय अहवालामध्ये स्पष्ट दिसत आहे. मात्र, या धक्कादायक प्रकारानंतर कमला आणि त्यांच्या पतीला मोठा धक्का बसला आहे. या निष्काळजीपणाबद्दल डॉक्टरांवर कारवाई होते की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शस्त्रक्रियादरम्यान रुग्णाच्या पोटात ऑपरेशन टूल्स राहिल्याची ही पहिला घटना नाही. याआधीही असा एक प्रकार समोर आला होता. सिक्कीमच्या गंगटोक येथे अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पोटात डॉक्टरांनी कात्री सोडली होती. तब्बल १२ वर्षानंतर महिलेला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. सिक्कीममधील गंगटोक येथील सर थुटोब नामग्याल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २०१२ मध्ये संबंधित महिलेवर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, अशी माहिती महिलेच्या पतीने दिली. पोटातील कात्री बाहेर काढण्यासाठी पुन्हा एकदा महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता या महिलेची प्रकृती स्थिर आहे. मात्र, अशा घटनांमुळे रुग्णांचा डॉक्टरांवरील विश्वास कमी होऊ लागला आहे.