बिहारमध्ये उष्माघाताच्या चटक्यामुळे तब्बल १०० हून अधिक विद्यार्थी बेशुद्ध पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राज्यात बेगुसराय आणि शेखपुरा येथील काही शाळांमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने ८ जूनपर्यंत सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर बिहारमध्ये १६ मे पासून सरकारी शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु राज्यात अनेक जिल्ह्यांत शाळांमध्ये वर्गादरम्यान आणि सार्वजनिक प्रार्थनेदरम्यान तीव्र उष्णतेमुळे विद्यार्थी आणि शिक्षक बेशुद्ध पडल्याची घटना घडत आहेत.
आज, बुधवारी राज्यातील औरंगाबाद, मोतीहारी, सिवान, शिवहर, पाटणा, बेगूसराय, मुंगेर, जमुई, बांका जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक बेशुद्ध पडल्याच्या बातम्या आल्या. या घटनांमुळे विरोधकांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टिकेची झोड उठवली आहे. तीव्र उन्हाळ्यासारखे संकट हाताळण्याची सरकारची पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शेखपुरा जिल्ह्यातील अरियारी तालुक्यातील मानकोल गावात एका हायस्कूलमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे वेगवेगळ्या शाळांमधील १२ विद्यार्थी बेशुद्ध पडले. येथे शाळा सुरू होताच सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी शाळेतील सात विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्या. दोन विद्यार्थ्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
'शाळेची प्रार्थना सुरू असताना प्रचंड उष्णतेमुळे विद्यार्थी बेशुद्ध पडले. आम्ही प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे,' अशी माहिती माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश प्रसाद यांनी दिली. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. रजनीकांत कुमार यांनी दिली.
हे वाचाः Heat Wave: उष्णतेच्या लाटेत थंड राहण्यासाठी उपयुक्त आहेत हे आयुर्वेदिक औषधी वनस्पती!
पाटणा जिल्ह्यातील घोसवारी तालुक्यात कुर्मीचक माध्यमिक शाळेत उष्णतेमुळे सहा विद्यार्थिनींची तब्येत अचानक बिघडली. एका विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना उपचारानंतर सोडण्यात आल्याची माहिती घोसवारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. नवल किशोर बैठा यांनी दिली.
बेगूसराय जिल्ह्यात मतिहानी माध्यमिक शाळा, एएन हायस्कूल (मटिहानी), विवेकानंद पब्लिक स्कूल (बलिया), उच्च माध्यमिक शाळा (मोहनपूर) येथे एकूण ४१ हून अधिक विद्यार्थी उन्हामुळे अचानक बेशुद्ध पडले होते. बेशुद्धावस्थेतील विद्यार्थ्यांना उचलून मटिहानी प्राथमिक आरोग्य केंद्र व रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे बेगूसरायचे जिल्हाधिकारी रौशन कुशवाह यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी शाळा गाठून शाळा प्रशासनाकडे संस्था बंद करण्याची विनंती केली होती.
बिहारमधील बहुतांश शहरांतील तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३८ पैकी १७ जिल्ह्यांत ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गया, बक्सर, नवादा, रोहतास आणि औरंगाबादसह दक्षिण बिहारमध्ये आज, बुधवार आणि उद्या गुरुवारी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारपासून तापमानात किंचित घट होणार असली तरी हवेतील आर्द्रता जास्त राहणार असल्याने काहीसा दिलासा मिळेल, असे आयएमडीचे शास्त्रज्ञ आशिष कुमार यांनी सांगितले.
विद्यार्थी बेशुद्ध होण्याच्या घटनेनंतर बिहारमध्ये विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. ‘बिहारमध्ये सरकार आणि लोकशाही नसून केवळ नोकरशाही आहे. शाळेच्या वेळेबाबतही मुख्यमंत्र्यांचे कुणी ऐकत नाही, एवढे ते कमकुवत आहेत. बाहेर तापमान ४७ अंश आहे, उष्णतेची लाट आहे, पण अधिकारी आपल्या वातानुकूलित चेंबरमध्ये बसून आदेश काढत आहेत. बिहारमधील शाळांच्या पायाभूत सुविधा कोणापासून लपून राहिलेल्या नाहीत... मात्र, मुख्यमंत्र्यांच्या हाती काहीच नाही.’ अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.