कोण आहेत स्वीस वंशाच्या सावित्री खानोलकर ज्यांनी तयार केलं परमवीर चक्र ?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कोण आहेत स्वीस वंशाच्या सावित्री खानोलकर ज्यांनी तयार केलं परमवीर चक्र ?

कोण आहेत स्वीस वंशाच्या सावित्री खानोलकर ज्यांनी तयार केलं परमवीर चक्र ?

Jan 08, 2025 03:18 PM IST

Who is Savitri Khanolkar : परमवीर चक्राची रचना आणि निर्मिती ही एका स्विस वंशाच्या भारतीय महिलेने केली असून त्यांचं नाव सावित्री खानोलकर हे आहे.

कोण आहेत स्वीस वंशाच्या सावित्री खानोलकर ज्यांनी तयार केलं परमवीर चक्र ?
कोण आहेत स्वीस वंशाच्या सावित्री खानोलकर ज्यांनी तयार केलं परमवीर चक्र ?

Who is Savitri Khanolkar : भारताच्या लष्करी इतिहासामध्ये परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. हा पुरस्कार परम शौर्य व त्यागाचे प्रतीक असून २१ युद्धवीरांना आतापर्यंत परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. या प्रतिष्ठित पदकाची रचना कुणी केली असावी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडणं सहाजिक आहे. भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्काराची रचना एका मराठी बोलणाऱ्या परदेशी महिलेने केली आहे. यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. परमवीर चक्र पदकाची रचना हि स्वीस वंशाच्या भारतीय महिलेने केली असून त्यांचे नाव हे सावित्री खानोलकर आहे. त्यांचा इतिहास हा जाऊन घेण्यासारका आणि प्रेरणादाई आहे.

भारतीय हवाई, नौदल आणि लष्करात सामील होणाऱ्या सर्व सैनिकांचे सर्वात मोठं स्वप्न हे पदक मिळविण्याचं असतं. देशाच्या महान वीरांसाठी हे पदक सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केलं. सावित्रीबाई यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी समर्पित केले. सावित्रीबाई खानोलकर यांच पूर्वीचं नाव हे इवा योने लिंडा होतं. त्यांचा जन्म २० जुलै १९१३ रोजी स्वित्झर्लंडमध्ये झाला. इवा यांची आई रशियन होती, तर त्यांचे वडील हंगेरीचे होते. त्यांचे वडील व्यवसायाने ग्रंथपाल होते, त्यामुळे इव्हा यांना लहानपणापासूनच विविध प्रकारची पुस्तके वाचायला मिळाली. पुस्तकांतूनच त्यांना भारत आणि त्याचा इतिहास कळला. या वाचनातून त्या भारताच्या प्रेमात पडल्या. या प्रेमाचा प्रभाव त्यांच्या पुढील आयुष्यातही दिसून आला. जेव्हा भारतीय लष्करातील अधिकारी कॅप्टन विक्रम खानोलकर त्यांच्या आयुष्यात आले. इवा यांनी त्याच्याशी लग्न केले. कॅप्टन विक्रम खानोलकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव इव्हा योने लिंडा वरून बदलून सावित्रीबाई खानोलकर असं करण्यात आलं.

सावित्रीबाई खानोलकरांनी अंगीकारली भारतीय संस्कृती

वाचनातून आधीच भारतीय संस्कृतीवर प्रभावित झालेल्या सावित्री खानोलकार या कॅप्टन विक्रम यांच्याशी लग्न केल्यानंतर पूर्णपणे बदलून गेल्या. त्यांनी भारतीय संस्कृती पूर्णपणे अंगीकारली. त्यांचा पेहराव आणि भाषाही भारतीय रंगात रंगली होती. सावित्रीबाईंचे पती विक्रम खानोलकर यांची आर्मी ऑफिसर म्हणून पहिली पोस्टिंग औरंगाबाद येथे झाली. पुढे मेजर पदावर बढती मिळाल्यावर ते पाटण्याला पोहोचले तेव्हा सावित्रीबाईही त्यांच्यासोबत तिथे गेल्या. येथे सावित्रीबाईंनी पाटणा विद्यापीठात प्रवेश घेतला आणि संस्कृत नाटक, वेद आणि उपनिषदांचा अभ्यास सुरू केला. यानंतर त्या स्वामी रामकृष्ण मिशनचा भाग बनल्या व त्यांनी सत्संगही केला. सावित्रीबाईंनाही संगीत आणि नृत्याची प्रचंड आवड होती, त्यामुळे त्यामध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी त्या उस्ताद पंडित उदय शंकर यांच्या शिष्या झाल्या. इथल्या सर्व विषयांत पारंगत झाल्यानंतर त्यांनी सेंट्स ऑफ महाराष्ट्र आणि संस्कृत डिक्शनरी ऑफ नेम्स ही दोन पुस्तकेही लिहिली, ती बरीच गाजली.

अशी झाली परमवीर चक्राची निर्मिती

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच भारत आणि पाकिस्तानमध्ये भीषण युद्ध सुरू झालं. ज्यामध्ये देशाच्या शूर जवानांनी शौर्य गाजवत सर्वोच्च बलिदान दिलं आणि या भूमीचं रक्षण केले. या युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या सन्मानार्थ भारतीय लष्कर नवीन पदकांची रचना करण्याचे काम करत होते. याची जबाबदारी मेजर जनरल हिरालाल अट्टल यांच्यावर आली. त्यासाठी त्यांनी सावित्रीबाईं यांची निवड केली. सावित्री या ज्ञानाचे भांडार आहे, त्यांना भारतीय संस्कृती, वेद आणि पुराणांची चांगली जाण आहे, असे अटल मानत होते. या कारणामुळे या पदकाची रचना त्याच्यापेक्षा कुणीच करू शकणार नाही अशी त्यांची भावना होती. सावित्रीबाई यांनी देखील हे आव्हान स्वीकारलं. काही दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सावित्रीबाईंनी या पदकाची रचना तयार करून अटल यांच्याकडे पाठवले. त्यांना सावित्रीबै यांनी तयार केलेले डिझाईन खूप आवडले. त्यांनी या पदकाला लगेच मंजूरी दिली. तेव्हापासून परमवीर चक्र (PVC) हा सर्व लष्करी शाखांच्या अधिकाऱ्यांसाठी भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणून ओळखला गेला. २६ जानेवारी १९५० रोजी भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनादिवशी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

असे आहे 'परमवीर चक्र'

परमवीर चक्र ३.५ सेमी व्यासासह कांस्य धातूवर गोलाकार आकारात डिझाइन करण्यात आलं आहे. त्याभोवती वज्राची चार चिन्हे बनवली आहेत. पदकाच्या मध्यभागी राजमुद्रा कोरण्यात आली आहे. तर परमवीर चक्राच्या दुसऱ्या बाजूला कमळाचे चिन्ह आहे, ज्यामध्ये हिंदी आणि इंग्रजीमध्ये परमवीर चक्र लिहिलेले आहे.

सावित्रीबाईंच्या नातेवाईकाला पहिले 'परमवीर चक्र'

परमवीर चक्राची रचना झाल्यानंतर योगायोगाने त्याची रचना करणाऱ्या सावित्रीबाईंच्या नातेवाईकांना या पदकाचा पहिला मान मिळाला. हे पदक ४ कुमाऊँ रेजिमेंटचे मेजर सोमनाथ शर्मा यांना देण्यात आले. सावित्रीबाईंची मोठी मुलगी कुमुदिनी शर्मा यांचे ते मेहुणे होते. १९४७-४८ च्या भारत-पाक युद्धात त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात आला. सोमनाथ शर्मा यांच्यानंतर आतापर्यंत इतर २० लष्करी जवानांना हा सन्मान देण्यात आला आहे.

सावित्रीबाईंनी इतर लष्करी पदकांचीही केली आहे रचना

परमवीर चक्राव्यतिरिक्त सावित्रीबाईंनी अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्राची रचना केली आहे. याशिवाय त्यांनी सामान्य सेवा पदक १९४७ ची देखील रचना केली आहे. १९५२ मध्ये मेजर जनरल विक्रम खानोलकर यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी स्वतःला पूर्णपणे अध्यात्माला समर्पित केले. त्यांनी दार्जिलिंगमधील राम कृष्ण मिशनसह काम केले. त्यांनी आयुष्यातील शेवटची वर्षे त्यांची मुलगी मृणालिनीसोबत घालवली. २६ नोव्हेंबर १९९० रोजी त्यांचे निधन झाले. भारतीय इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर