Asaduddin Owaisi : सावरकरांसारखे भ्याड वर्तन बंद करा… ओवेसी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Asaduddin Owaisi : सावरकरांसारखे भ्याड वर्तन बंद करा… ओवेसी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता

Asaduddin Owaisi : सावरकरांसारखे भ्याड वर्तन बंद करा… ओवेसी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता

Jun 28, 2024 10:48 AM IST

asaduddin Owaisi on house vandalism : दिल्लीतील शासकीय निवासस्थानावर झालेल्या शाईफेकीवर बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी विनाकारण विनायक दामोदर सावरकर यांना वादात ओढलं आहे.

सावरकरांसारखे भ्याड उद्योग बंद करा; ओवेसींच्या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता
सावरकरांसारखे भ्याड उद्योग बंद करा; ओवेसींच्या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता (ANI)

asaduddin Owaisi on house vandalism : राजधानी दिल्लीतील घरावर काही जणांनी शाई फेकल्यामुळं संतापलेले एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कारण नसताना सावरकरांना वादात ओढलं आहे. माझ्या घरावरील शाईफेक हे सावरकरांप्रमाणे भ्याड वर्तन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

लोकसभेत संसद सदस्यत्वाची शपथ घेताना ओवेसी यांनी ‘जय पॅलेस्टाइन’ अशी घोषणा दिली होती. त्यावरून ते टीकेच्या रडारवर आले आहेत. दिल्लीतील एका वकिलांना त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं केली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर काही अज्ञात लोकांनी गुरुवारी संध्याकाळी ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पोस्टर चिकटवून त्यांच्या निलंबनाची मागणी केली. भारत माता की जय, आम्ही इस्रायलच्या पाठीशी… अशा घोषणा लिहिल्या. तसंच, घरावर शाईफेक केली. यावर ओवेसी यांनी आज प्रतिक्रिया दिली.

'माझ्या घराला अनेकदा लक्ष करण्यात आलं आहे. हे माझ्यासाठी नवीन नाही. पोलिसांच्या नाकाखाली हा सगळा प्रकार झाला. पण तेही हतबल असल्याचं दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या डोळ्यासमोर हे घडत आहे. संसदेच्या संदस्यांना ते सुरक्षेची हमी देणार की नाही, असा सवाल ओवेसी यांनी केला.

'अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही. सावरकरांसारखं हे भ्याड वर्तन थांबवा आणि माझा सामना करण्याची मर्दानगी दाखवा. थोडीफार शाई किंवा काही दगड फेकून पळून जाऊ नका, असा टोला त्यांनी हल्लेखोरांना हाणला.

शाई फेकणाऱ्यांनी दिल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा

एआयएमआयएमचे बहादूरपुरा विधानसभेचे आमदार मोहम्मद मुबीन यांनी या संदर्भात काही दावे केले आहेत. ‘उपद्रवी लोकांनी ओवेसी यांच्या घराची तोडफोड करताना 'जय सियाराम’च्या घोषणा दिल्या. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

पोलीस म्हणतात, कारवाई होणार!

या प्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'हल्लेखोर तरुणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं पीटीआयशी बोलताना सांगितलं.

राहुल गांधींनीही केलीय सावरकरांवर टीका

सत्ताधारी भाजपसह शिवसेना व महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांना सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल आदर आहे. हे पक्ष सावरकरांना आदर्श मानतात. याउलट भूमिका काँग्रेसची आहे. सावरकर हे ब्रिटिशांचे एजंट होते. त्यांनी अनेकदा इंग्रजांची माफी मागितली होती, अशी काँग्रेसची भूमिका आहे. राहुल गांधी यांनी अनेकदा जाहीरपणे अशी वक्तव्यं केली आहेत. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. आता ओवेसी यांनीही तसंच वक्तव्य केलं आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर