PM Modi in Marseilles : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी फ्रान्सच्या मार्सेल शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील या शहराच्या महत्त्वपूर्ण इतिहासाची आठवण करून दिली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मार्सेलचे विशेष स्थान राहिले आहे. या शहरात वीर सावरकरांनी इंग्रजांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मार्सेलच्या नागरिकांनी व फ्रेंच आंदोलकांनी सावरकर यांना ब्रिटिशांच्या देऊ नये अशी भूमिका घेतली होती. यामुळे पंतप्रधान मोदी यांनी येथील जनतेचे आभार देखील मानले. तसेच त्यांचा वीर सावरकर यांचा लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत असल्याचे देखील मोदी म्हणाले.
वीर सावरकरांचा मार्सेलशी संबंध १९१० पासून आहे. वीर सावरकर यांना लंडनमध्ये अटक केल्यावर त्यांना राजकीय कैदी म्हणून भारतात आणले जात होते. तेव्हा काही काळ त्यांना या शहरात आणलं होतं. यावेळी सावरकर यांनी याच शहरातून इंग्रजांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला होता. सावरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठी भूमिका बजावली होती. ब्रिटिश राजवट उलथवण्यासाठी त्यांनी केलेल्या कारवायाबद्दल त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ब्रिटिश जहाज एसएस मोरियातून भारतात आणले जात होते. त्यांना भारतात आणून त्यांच्यावर खटला चालवला जाणार होता.
८ जुलै १९१० रोजी हे जहाज मार्सेल बंदरावर पोहोचले तेव्हा सावरकरांना येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. फ्रान्समध्ये आश्रय मिळेल या आशेने त्यांनी पोर्टहोलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि पोहून किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश येण्याआधीच फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. आंतरराष्ट्रीय कायद्याने राजकीय निर्वासितांना संरक्षण देण्याचा अधिकार दिला आहे. या वादग्रस्त प्रत्यार्पणामुळे ब्रिटन आणि फ्रान्समध्ये राजकीय वाद निर्माण झाला होता. अनेक फ्रेंच क्रांतिकारकांनी व नेत्यांनी फ्रान्सच्या भूमीवर ब्रिटिश सैन्याने केलेल्या कारवाईला विरोध केला आणि सावरकरांना ब्रिटीशांना द्यायला नको होते, असा युक्तिवाद केला. हे प्रकरण कायमस्वरूपी लवाद न्यायालयापर्यंत पोहोचले, पण सावरकरांना अखेर ब्रिटिश कोठडी सुनावण्यात आली आणि नंतर अंदमान-निकोबार बेटांवरील सेल्युलर तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्सेल येथे भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले असून यावेळी त्यांनी या आठवणींणा उजाळा देत त्यावेळी फ्रेंच नागरिकांनी व क्रांतिकारकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचे आभार मानले.
संबंधित बातम्या