Saudi Arabia Royal Palace : खनिज तेलाच्या जिवावर स्वत:ची आर्थिक भरभराट करून घेणाऱ्या सौदी अरेबियाला सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. तसेच पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून अनेक तंत्रज्ञान देखील विकसित होत असल्याने भविष्यात सौदी अरेबिया, कुवेत, कतार या देशांना आणखी गंभीर आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. ही चिंतेची बाब असल्याने सौदी अरेबियाने या समस्येवर उपाय शोधण्यास सुरुवात केली आहे. सौदीत सध्या क्रीडा स्पर्धांना व पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच भाग म्हणून सौदी अरेबिया आता माजी शासक सौद बिल अब्दुलअजीझ यांचा राजवाडा भाड्याने देण्यास सुरुवात करणार आहे. या द्वारे पर्यटन वाढीला चालना देण्याचा प्रयत्न सौदी अरेबियाचा आहे.
सौदी अरेबियात खनिज तेलानंतर पर्यटन हा महत्वाचा व्यवसाय आहे. दरवर्षी लाखो पर्यटक सौदी अरेबियाला भेटी देत असतात. देशात पर्यटनाना चालना देण्यासाठी सौदी अरेबिया आता माजी शासक सौद बिल अब्दुल अझीझ यांचा राजवाडा भाड्याने देणार आहे. या राजवाड्यात पर्यटकांना रात्र घालवता येणार आहे. तब्बल ३ लाख ६५ हजार स्क्वेअर फुटांचा हा विशाल महाल आधुनिक सौदी अरेबियाचे दुसरे शासक सौद बिन अब्दुलअजीज यांचा राजवाडा होता. रेड पॅलेस म्हणून ओळखला जाणारा हा राजवाडा १९४० मध्ये तत्कालीन क्राउन प्रिन्ससाठी बांधण्यात आला होता. आता हा राजवाडा अल्ट्रा लक्झरी हॉटेल म्हणून विकसित केला जात आहे. या राजवाड्यात राहून पर्यटकांना सौदी अरेबियाचे राजेशाही जीवन अनुभवता येणार आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बुटीक ग्रुप या बिल्डर कंपनीकडून या पॅलेसला नवा लूक दिला जाणार आहे. अनेक दशके हा राजवाडा सौदीच्या राज्यकर्त्यांचे निवासस्थान होता. यानंतर या ठिकाणी सरकारचे मुख्यालय तयार करण्यात आले होते. आता पर्यटन वाढीसाठी हा राजवड्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले जाणार आहे. या राजवाड्यात एकूण ७० खोल्या आहेत. या ठिकाणी पर्यटक राहतील. यामुळे लोकांना या राजवाड्यात फक्त राहण्याची संधी मिळणार नाही तर ते सौदी अरेबियाच्या राजेशाही जीवनाची अनुभूति देखील घेऊ शकणार आहेत. याशिवाय सौदी अरेबियाच्या राजघराण्याचे आवडते पदार्थ या हॉटेलमध्ये दिले जाणार आहेत. अशा प्रकारे, राहण्यापासून ते खाण्यापर्यंत, लोकांना सौदी अरेबियाच्या शाही जीवनशैलीचा अनुभव घेता येईल. या पॅलेसमध्ये स्पा सेंटरही सुरू केले जाणार आहे, जिथे पारंपारिक सौदी उपचार पद्धती उपलब्ध असतील.
सौदी अरेबियामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे बुटीक समूहाचे म्हणणे आहे. या राजवाड्यात राहण्यासाठी पर्यटकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. बुटीक ग्रुपचे सीईओ मार्क डी. कोसिनिस म्हणाले, 'राजेशाही जीवन जगण्याचा अनुभव येथे राहणाऱ्यांना घेता येणार आहे. सौदी अरेबियाच्या राजेशाही जीवनातील सर्व काही या राजवाड्यात येथे येणाऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय या पॅलेसमध्ये राहिल्याने लोकांना सौदी अरेबियाचा इतिहास आणि संस्कृती देखील समजण्यास मदत होईल.
संबंधित बातम्या