मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Female Robot: ‘सेक्स आणि राजकारण.. ना बाबा ना’; सौदी अरेबियातला चतुर रोबो वादग्रस्त विषय टाळणार

Female Robot: ‘सेक्स आणि राजकारण.. ना बाबा ना’; सौदी अरेबियातला चतुर रोबो वादग्रस्त विषय टाळणार

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Mar 26, 2024 05:26 PM IST

सौदी अरेबियाने ‘सारा’ नावाचा पहिला मानवी रोबो तयार केला आहे. या रोबोचं वैशिष्ट्य म्हणजे सेक्स आणि राजकारण हे विषय टाळणार आहे.

Saudi Arabia's first humanoid robot 'Sara'
Saudi Arabia's first humanoid robot 'Sara'

सौदी अरेबियाने ‘सारा’ नावाचा पहिला मानवी रोबो तयार केला आहे. या रोबोचं वैशिष्ट्य म्हणजे सौदी अरेबिया या देशात सेक्स आणि राजकारण हे विषय सार्वजनिक व्यासपीठावर चर्चेमध्ये टाळले जातात याचे भान हा रोबो ठेवणार आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील QSS AI कंपनीने हा रोबो विकसित केला असून सौदी अरेबियासारख्या एकीकडे तांत्रिक प्रगती साधणाऱ्या तर दुसरीकडे सामाजिक निर्बंध लादणाऱ्या देशात ‘सारा’ रोबो काम करणार आहे. सारा रोबो ही २५ वर्षाची तरुणी असून तिने सौदी अरेबियातीस महिला नेसतात तसे पारंपरिक हिजाब असलेला ड्रेस घातलेला आहे. 

‘सारा रोबोच्या बाह्य रचनेतच सौदी अरेबियाच्या पारंपारिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसेल. साराने पारंपारिक झग्यासारखा पोशाख परिधान केला असून डोक्यावर अबाया आहे. साराला अरबी आणि इंग्रजी भाषा समजते. सारासोबत संवाद साधताना देशात सार्वजनिक चर्चेसाठी वादग्रस्त समजले जाणारे सेक्स आणि राजकारणासारखे विषय टाळण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे प्रोग्राम फिट केले आहे.' अशी माहिती QSS AI कंपनीचे सीईओ एली मेत्री यांनी दिली. 

सौदी अरेबियाची कायदा व्यवस्था ही मुस्लिम शरीयत कायद्यावर आधारलेली आहे. या देशात अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. आर्थिक सुधारणांसोबतच मोठ्या प्रमाणावर सामाजिक सुधारणांचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये महिलांच्या ड्रेस कोडमध्ये शिथिलता आणणे, महिलांना ड्रायव्हिंगवर असलेली बंदी उठवणे यांचा समावेश आहे. तरीही, सौदी अरेबियामध्ये सेक्स या विषयाबद्दल सार्वजनिक चर्चा सामान्यतः निषिद्ध मानली जाते. सौदी अरेबियात राजेशाही असल्याने राजकारणावर फार खुलेपणाने चर्चा केली जात नाही. 

दरम्यान, सारा रोबोची निर्मिती करून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात आपण मागे नाहीत, हे सौदी अरेबियाने सिद्ध करून दाखवलं आहे. सारा रोबोची निर्मिती करताना Large Language Model (LLM) चा वापर करण्यात आला असून याद्वारे 'सारा' रोबोला अरबी आणि इंग्रजी भाषा समजण्यास मदत होते. LLMच्या मदतीने रोबो मजकूर आणि संवाद तयार करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी इंटरनेटवर असलेल्या विशाल डेटासेटवर प्रशिक्षित मशीन लर्निंगचा वापर करतात. 

सौदी अरेबियाने विकसित केलेले सारा रोबो म्हणजे तांत्रिक नवकल्पना आणि खोलवर रुजलेल्या सामाजिक मूल्यांच्या छेदनबिंदूचे एक आकर्षक उदाहरण मानले जाते. सौदी अरेबियाचे रोबोटिक्स आणि एआय क्षेत्रात संशोधन करताना मात्र प्रोग्रामिंग आणि डिझाइन मुद्दाम देशात प्रचलित पुराणमतवादी गोष्टींचे पालन करत असल्याचे दिसते, अशी टीका होत आहे.

रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर बनण्यासाठी सौदी अरेबियाने अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. कोविड साथीच्या काळात २०२१ मध्ये सौदी अरेबियाने मानवी संपर्काच्या नियमांचा आदर करत हज यात्रेदरम्यान यात्रेकरूंना सेवा देण्यासाठी काही रोबो डिझाइन केले होते. लोकांचा आपसांत संपर्क टाळण्यासाठी हज यात्रेदरम्यान हे रोबो यात्रेकरूंना पाणीपुरवठा करण्याचे काम करत होते.

 

 

 

 

 

 

 

 

IPL_Entry_Point