
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात यमकनमर्डी मतदार संघाचे काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी यांचा नुकताच सिद्धरामय्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुका हा साखरसम्राट जारकीहोळी कुटुंबीयांचा गढ मानला जातो. जारकीहोळी कुटुंबात एकूण पाच भावंड आहेत. त्यापैकी सतीश यांच्यासह चार जण सध्या विद्यमान आमदार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ पैकी ११ जागा कॉंग्रेसने पटकावल्या आहेत. जिल्ह्यातील गोकाक मतदारसंघातून सतीश यांचे बंधु रमेश जारकीहोळी (भाजप) तर आरभावी या मतदारसंघातून दुसरे बंधु भालचंद्र जारकीहोळी (भाजप) हे निवडून आले आहेत. तिसरे बंधु लखन जारकीहोळी हे विधानपरिषदेचे भाजपचे आमदार आहेत.
सतीश जारकीहोळी यांनी शपथ घेताना गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून मंत्रिपदाची शपथ घेतली होती. अशुभ मानल्या जाणाऱ्या राहू काळात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. सतीश जारकीहोळी हे ‘मानव बंधुत्व वेदिके’ नावाची सामाजिक संघटना चालवतात. या संघटनेच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम ते राबवत असतात. त्याचाच भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी कार्यकर्त्यांसह बेळगावच्या स्मशानभूमीत जाऊन तेथे रात्रभर थांबण्याचा कार्यक्रम आयोजित करत असतात.
सतीश जारकीहोळी यांच्या राजकीय कारकिर्दिची सुरुवात जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षातून झाली. या पक्षाकडून त्यांना दोन वेळा विधानपरिषदेवर जाण्याची संधी प्राप्त झाली. २००८ साली कर्नाटकात मतदारसंघ पुनर्रचनेत यमकनमर्डी या अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघातून सतीश हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे.
कर्नाटकात कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री देवराज ऊर्स यांनी अहिंदा (अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय आणि दलित) या जातींची मोट बांधली होती. मूळ जनता दल (धर्मनिरपेक्ष)मधून कॉंग्रेसमध्ये आलेले सिद्धरामय्या यांच्या राजकारणात धर्मनिरपेक्षतेसोबत अहिंदा जातींचं समिकरण मध्यवर्ती असतं. यामुळे कर्नाटकच्या राजकारणात सिद्धरामय्या यांची सतीश जारकीहोळी यांच्याशी अतिशय जवळीक असल्याचं बोललं जातं. त्यामुळे सतीश यांना मंत्रिमंडळ स्थापनेच्या पहिल्या टप्प्यातच मंत्री बनवलं गेलं आहे.
संबंधित बातम्या
