china digging near pangong lake : चीन आपली विस्तारवादादी वृत्ती सोडण्याचे नाव घेत नाही. एकीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या वादावर अद्याप दोन्ही देशांमध्ये तोडगा निघालेला नाही. या साठी चीनचे परराष्ट्रमंत्री भारतीय परराष्ट्रमंत्र्यांसोबत बैठक घेत असतांना दुसरीकडे पूर्व लडाखमधील पँगोंग तलावाजवळ चिनी सैन्याने पुन्हा आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. चिनी सैन्य येथे दीर्घकाळ राहण्यासाठी खोदकाम करत आहे. शस्त्रे आणि इंधन साठविण्यासाठी त्यांनी येथे भूमिगत बंकर बांधले असून त्याच वेळी, त्यांची चिलखती वाहने सुरक्षित ठेवण्यासाठी, पक्के बांधकाम देखील केले आहेत. उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांवरून चीनचा कावेबाजपणा उघड झाला आहे.
सिरजाप येथे पीपल्स लिबरेशन आर्मीचा (पीएलए) लष्करी तळ आहे, जो पँगॉन्ग तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर पर्वतांमध्ये तयार करण्यात आला आहे. तलावाभोवती तैनात असलेल्या चिनी सैन्याचे हे मुख्यालय आहे. चीनचा हा लष्करी तळ भारताने दावा केलेल्या भागात बांधण्यात आला आहे. चीनचा हा लष्करी तळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) सुमारे ५ किमी अंतरावर आहे. मे २०२० मध्ये गलवान घटणेपूर्वी येथे दोन्ही देशाचे सैन्य राहत नव्हते.
ब्लॅक स्कायने दिलेल्या फोटोंनुसार, २०२१-२२ मध्ये बांधलेल्या बेसमध्ये भूमिगत बंकर आहेत. हे शस्त्रे, इंधन किंवा इतर पुरवठा साठवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. या वर्षी ३० मे रोजी घेतलेल्या छायाचित्रात एका मोठ्या क्षेत्रात बांधण्यात आलेल्या बंकरचे ८ प्रवेशद्वार स्पष्टपणे दिसत आहेत. आणखी एक लहान बंकर आहे, ज्याला पाच प्रवेशद्वार आहेत. दोन्ही जवळच आहेत.
ब्लॅकस्काय विश्लेषकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “बेसमध्ये चिलखती वाहने पार्किंगसाठी, चाचणी श्रेणी, इंधन आणि दारूगोळा साठवण्याची सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या सोबतच काही पक्के रस्ते देखील बांधण्यात आले आहे. या ठिकाणी दळणवळणासाठी बांधकामे देखील करण्यात आली आहे.
हा तळ गलवान व्हॅलीच्या दक्षिण-पूर्वेस १२० किलोमीटर अंतरावर आहे. गलवान व्हॅली येथे जून २०२० मध्ये भारत आणि चीनी सैन्यात झटापट झाली होती. यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर कीमान ४० चीनी सैन्य ठार झाले होते. मात्र, चीनने त्यांचे केवळ ४ चिनी सैनिक ठार झल्याचा दावा केला होता.
सीमेवरील पुढे आलेल्या या फोटोंवर भारताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पँगॉन्ग लेकच्या आसपासच्या भागात तैनात असलेल्या एका माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, चीनने भूमिगत बंकर्सच्या बांधकामात केलेली वाढ लष्करी दृष्टिकोनातून चिंताजनक आहे. ते म्हणाले, "आजच्या युद्धभूमीत, उपग्रह किंवा हवाई निरीक्षण साधनांचा वापर करून सर्वकाही अचूकपणे पाहिले जाऊ शकते. चीनला उत्तर देण्यासाठी चीनशी संबंधित सीमेवर चांगल्या प्रकारची रस्ते बांधणी करणे हाच उपाय आहे.
एका दुसऱ्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर संगितले की, २०२० मध्ये स्टँडऑफ सुरू झाल्यापासून भारताने चीनी सीमेवर लष्कराची कुमक वाढवली आहे. यात सीमावर्ती भागात लॉजिस्टिक सपोर्टसाठी विविध रस्ते, पूल, बोगदे, एअरफील्ड आणि हेलिपॅड देखील बांधण्यात आली आहे.