Sanjay Raut questions devendra Fadnavis : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध व मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात जामिनावर असलेले माजी मंत्री नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्यानं राज्यातील राजकारण तापलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अजित पवार गटालं पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस व भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
राऊत हे पत्रकारांशी बोलत होते. 'नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत गेल्यामुळं भाजप विरोध करत आहे. सत्ता येते आणि जाते, आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे. अशी नवीच माहिती फडणवीसांनी राज्याला दिली आहे. भाजपवाले हे कायम ढोंग करत आले आहेत. आताही तेच चाललं आहे, असं राऊत म्हणाले.
'जे आरोप नवाब मलिक यांच्यावर आहेत, तेच आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहेत. त्याचे दाऊदच्या माणसांशी व्यवहार आहेत. त्या प्रकरणी ईडीनं पटेल यांची मुंबईतील प्रॉपर्टी जप्त केली आहे. पटेल यूपीएच्या सरकारमध्ये मंत्री असताना भाजपनं सोनिया गांधी यांना प्रश्न विचारले होते. त्यात पटेल यांच्या बाबतीत फडणवीसांना काय म्हणायचं आहे, असा सवाल राऊत यांनी केला.
‘७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार, ईडीनं ज्यांच्यावर अनेक धाडी घातल्या ते प्रताप सरनाईक, ईडी ज्यांना अटक करायला निघाली होती ते भावना गवळी, हसन मुश्रीफ अशी किती नावं घ्यायची? मुद्दा नैतिकतेचाच असेल तर भाजपनं ज्यांच्यासोबत मिळून सरकार बनवलंय. मग तो शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल. हे सगळेच भ्रष्टाचारी आहेत. मग नवाब मलिक यांच्यावरच हल्ले का,’ अशी विचारणा राऊत यांनी केली.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे विधानसभेत एकमेकांच्या शेजारी बसतात. तरीही एकमेकांना पत्र लिहितात. काय जमाना आलाय? फडणवीसांनी विधानसभेत उभं राहून अजित पवारांना विचारलं पाहिजे की नवाब मलिक तुमच्यासोबत कसे? आम्ही हे सहन करणार नाही हे तिथंच ठणकावून सांगा. ते करत नाहीत आणि पत्र लिहिण्याची ढोंगं करतात. हे असं भाजपवाले वारंवार करतात, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.