छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ कार दरीत कोसळून २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. श्वेता दीपक सुरवसे असं या तरुणीचं नाव होतं. सोशल मीडिया रील बनवण्याच्या नादात श्वेताचा मृत्यू झाला होता. श्वेता व तिचा मित्र शिवराज मुळे हे दोघे संभाजीनगर येथून एका कारने दत्त मंदिर परिसरात आले होते. तिने मित्राला सांगितले की, मी कार चालवते तू त्याची रिल बनव. तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिनं कार पुढं नेण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला आणि ही कार पाठीमागे असलेल्या दरीत कोसळली. यात तरुणीला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून श्वेताच्या बहिणीने ही सुनियोजित हत्या असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
मृत श्वेता सुरवसे हिची मावस बहिणी असलेल्या प्रियंका यादव यांनी म्हटले की, रील बनवताना तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटलं जातंय. मात्र तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजपर्यंत एकही रील दिसत नाही. तिला गाडी शिकवणारा मुलगा तिचा मित्र आहे की, बॉयफ्रेंड होता हे माहिती नाही. मित्राकडे जाते म्हणून ती सकाळी घराबाहेर पडली होती, मात्र संध्याकाळी तिच्या भावाला फोन आता की, तिच्या अपघात झाला असून पाय मोडला आहे. आम्हाला पोलीस ठाण्यात बोलावले मात्र तिच्या निधनाची बातमी पाच तासांनी समजली. आमच्या आधी अन्य नातेवाईकांना व प्रसारमाध्यमांना समजली होती. रील बनवताना एका तरुणीचा मृत्यू ही बातमी पाहून आम्हाला खात्री पटली की, तिचा मृत्यू झाला आहे.
तिचा मित्र तिला घेऊन घरापासून दूर ३० ते ४० किलोमीटर अंतरावर का गेला. श्वेताने आतापर्यंत एकही रील बनवली नसताना तिला त्या दिवशीच का रील बनवायची होती? यामुळे स्पष्ट होते की, तिला घरापासून दूर नेऊन तिची सुनियोजितपणे हत्या केली आहे, असा गंभीर आरोपही तिने केला आहे.
श्वेताना याआधी कधीही गाडी चालवली नाही. त्यामुळे दरीजवळ व उंच टेकडीवर ती का गाडी हातात घेईल. तिला गाडी शिकवण्याची काय गरज होती. तिच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही आणि जो तिला वाहन शिकवत होता त्याच्याकडे वाहन शिकवण्याचा परवाना नाही. रिव्हर्स गिअरमध्ये गाडी कोण शिकवतं? जर त्याला गाडी शिकवायचीच होती तर तोही तिच्या शेजारी बसला असता. मात्र तो बाहेर उभं राहून तिला क्लच दाब असं ओरडून सांगत होता. त्यामुळे जर श्वेता त्याच्याबरोबर गेली नसती तर आज जिवंत असती.
दरम्यान, मृत श्वेताचा मित्र सूरज मुळे याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. निष्काळजीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे खुलताबाद पोलिसांनी सांगितले.