महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर, ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेला विरोध करत अबू आझमी यांची घोषणा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर, ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेला विरोध करत अबू आझमी यांची घोषणा

महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर, ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेला विरोध करत अबू आझमी यांची घोषणा

Dec 07, 2024 02:31 PM IST

Samajwadi Party Quits MVA: सपा नेते अबू अझमींनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

समाजवादी पक्षाचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय
समाजवादी पक्षाचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय (ANI)

Abu Azmi News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या जखमेवर मीठ चोळणारी माहिती समोर आली आहे. मित्र पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बाबरी मशीद विध्वंसाबाबत शिवसेनेच्या भूमिकेमुळे समाजवादी पक्षाने हा निर्णय घेतला, अशी माहिती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी दिली.

नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी आजपासून तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. विधिमंडंळाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षातील आमदारांनी शपथ घेण्यास नकार देत सभा त्याग केली. मात्र, मविआच्या बहिष्कारानंतरही सपा नेते अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतली. शिवसेनेसोबत न राहण्याची भूमिका घेत त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेचे विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी विध्वंसाबाबत केलेल्या पोस्टला प्रत्युत्तर म्हणून सपाने हे पाऊल उचलले आहे. नार्वेकर यांनी मशीद पाडल्याचा फोटो पोस्ट केला. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांनी हे केले त्यांचा मला अभिमान आहे, अशी कमेंट केली. शिवसेना उबाठा नेत्यांनी या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि स्वत:चे फोटोही पोस्ट केले आहेत.

अबू आझमी काय म्हणाले?

‘शिवसेनेने नेहमीचे धर्मांध राजकारण केले, ते आम्हाला पटलेले नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत. राष्ट्रीय स्तरावरचा निर्णय अखिलेश यादव घेतील, असे अबू आझमी यांनी स्पष्ट केले आहे. ‘शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काम करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले जाते. ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडणाऱ्यांचे अभिनंदन केले जाते, अशा पक्षासोबत समाजवादी पक्ष राहू शकत नाही’, असेही त्यांनी म्हटले.

महाविकास आघाडीला धक्का

अबू आझमींच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तसेच आझमींच्या पक्षातून जाण्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ दोनने कमी झाले. आझमींच्या जाण्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ आता ५० वरून ४८ वर आले आहे.

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत दारून पराभवाला सामोरे जावा लागले. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने एकतर्फी विजय मिळवला. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. याचेच पडसाद आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमला विरोध दर्शवत आमदारकीची शपथ घेण्यास नकार दिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर