मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya : राममंदिराच्या बांधकामासाठी महाराष्ट्राचा हातभार, चंद्रपुरातील सागवान लाकूड अयोध्येला रवाना
Ram Mandir Construction Status
Ram Mandir Construction Status (HT)

Ayodhya : राममंदिराच्या बांधकामासाठी महाराष्ट्राचा हातभार, चंद्रपुरातील सागवान लाकूड अयोध्येला रवाना

29 March 2023, 17:56 ISTAtik Sikandar Shaikh

Ram Mandir Construction Status : राममंदिराचं बांधकाम हे अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यातच आता महाराष्ट्रातूनही मंदिराच्या बांधकामासाठी सागवानची खेप पाठवण्यात आली आहे.

Ram Mandir Construction Status : उत्तर प्रदेशाच्या अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिरच्या बांधकामासाठी महाराष्ट्रातून सागवानच्या लाकडांची पहिली खेप पाठवण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मोठ्या प्रमाणात सागवानाची लाकडं वापरली जाणार असून त्यासाठी विदर्भाच्या चंद्रपुरातील उत्तम दर्जाची लाकडं पाठण्यात आली आहे. त्यामुळं आता राममंदिराच्या उभारणीत महाराष्ट्रानंही मोठा हातभार लावल्याचं बोललं जात आहे. राम मंदिरासाठी सागवान नेण्यात आल्यामुळं चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन शहरांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

अयोध्येतील राम मंदिराचे महाद्वार, मुख्य मंदिराची संरचना आणि गाभाऱ्याच्या दरवाजांसाठी सागवानाच्या लाकडांचा वापर केला जाणार आहे. भाजपा नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काष्ठपूजन केल्यानंतर सागवान लाकडांची पहिली खेप अयोध्येसाठी रवाना करण्यात आली. चंद्रपुरातील आलापल्लीच्या जंगलातील सागवानाची लाकडं राम मंदिराच्या उभारणीसाठी नेण्यात आले आहेत. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सर्वोत्तम सागवानच्या लाकडांसाठी डेहराडून येथील वन संशोधन संस्थेला संपर्क केला होता. त्यावेळी संस्थेनं चंद्रपुरातील सागवान सर्वोत्तम असल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर आता चंद्रपुरातून राम मंदिरासाठी १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकडं देण्यात येणार आहे.

श्रीराममंदिर ट्रस्टनं सागवान लाकडांसाठी राज्यातील वनविभागाला विनंती केली होती. त्यानंतर ट्रस्टच्या विनंतीला मान देत वन विभागानं आलापल्लीच्या जंगलातील अतिशय उत्कृष्ट सागवान राममंदिरासाठी देण्याचा निर्णय घेतला. सागवानची लाकडं अयोध्येला घेऊन जाणाऱ्या वाहनाला फुलांचे हार लावून सजवण्यात आलं असून लोकांनी त्यावर रंगांची उधळण केली आहे. यापूर्वी प्रभू श्रीरामाची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळमधून दुर्मिळ दगड आणण्यात आले होते. त्यानंतर आता गाभाऱ्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्रातून सागवान नेण्यात येत आहे.