Pavel Antov : पुतीन विरोधी रशियन खासदाराचा भारतातील हॉटेलात संशयास्पद मृत्यू; जगभरात खळबळ
Pavel Antov Death Case : काही दिवसांपूर्वीच पॉव्हेल यांनी युक्रेनवरील हल्लावरून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर प्रखर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांचा भारतात मृत्यू झाला आहे.
Russian MP Pavel Antov Death Case : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रखर विरोधक आणि रशियन खासदार पॉव्हेल अॅटोव्ह यांचा भारतातील ओडिशातल्या एका तारांकित हॉटेलमध्ये मृत्यू झाला आहे. ओडिशाच्या रायगडामध्ये ते ६५ वा वाढदिवस साजरा करत असताना हॉटेलच्या तिसर्या मजल्यावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं जगभरात खळबळ उडाली असून रशियन सरकारद्वारे या प्रकरणाची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रेंडिंग न्यूज
काही दिवसांपूर्वीच ओडिशातच एका रशियन खासदाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एका रशियन खासदाराचा भारतात मृत्यू झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॉव्हेल यांनी त्यांच्या चार साथीदारांसह दरिंगबाडीचा दौरा केल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये चेक-इन केलं. त्यादिवशी त्यांनी त्यांचा ६५ वा वाढदिवसही साजरा केला. परंतु दुसऱ्या दिवशी हॉटेलबाहेर त्यांचा मृतदेह आढळून आला. यापूर्वी मृत्यू झालेले रशियन खासदार व्लादिमीर यांच्या निधनामुळं पॉव्हेल दुखी होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ओडिशातील दुःखद घटनेत लागोपाठ दोन रशियन खासदारांचा मृत्यू होण्याची घटना दुःखद असून मृतांच्या नातेवाईकांशी आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याची माहिती रशियाच्या भारतातील दूतावासानं दिली आहे. पॉव्हेल यांच्या नातेवाईकांच्या संमतीनं त्यांचं अत्यंसंस्कार करण्यात आल्याची माहिती ओडिशा पोलिसांनी दिली आहे.