गेल्या अडीच वर्षापासून युक्रेनशी युद्ध लढणाऱ्या रशियाला घटत्या लोकसंख्येचा सामना करावा लागत आहे. अनेक पद्धतीनं जनजागृती करूनही लोकसंख्या वाढत नसल्यानं व्लादिमीर पुतीन सरकारनं आता अनोख्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे. त्यात हनिमून फंड देण्यापासून सेक्स मंत्रालय स्थापण्याच्या उपायांचा समावेश आहे.
लोकसंख्येच्या घटत्या दराचा सामना करण्यासाठी रशियन सरकारनं जनजागृती सुरू केली आहे. आतापर्यंत अनेक आकर्षक ऑफर्स आणि आश्वासनं दिली आहेत. मात्र इतकं सगळं करूनही अद्याप यश आलेले नाही. त्यामुळं आता जन्मदर वेगळे पर्याय अवलंबण्यात येणार आहेत. त्यात रात्री १० नंतर लाईट आणि इंटरनेट बंद करणं, मातांना प्रोत्साहन देणे, दाम्पत्याच्या पहिल्या डेटचा संपूर्ण खर्च सरकारनं उचलणं, सेक्स मंत्रालय स्थापन करणं अशा पाच प्रस्तावांवर विचार सुरू आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निष्ठावंत आणि कौटुंबिक संरक्षण समितीच्या अध्यक्षा नीना ओस्तानीना यांनी सेक्स मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली आहे. हे मंत्रालय लोकसंख्या वाढवण्यासाठी विविध मार्ग शोधेल, जेणेकरून देशातील या समस्येवर मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रशियाच्या घटत्या लोकसंख्येमागे युक्रेन संघर्ष हेही एक प्रमुख कारण आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झालेल्या या युद्धात लाखो रशियन सैनिक शहीद झाले आहेत. या युद्धात रशियानं सुमारे सात लाख सैनिक गमावले असून ही संख्या सातत्यानं वाढत असल्याचा दावा ब्रिटीश अधिकाऱ्यांनी नुकताच केला होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये रशिया दररोज सरासरी १५०० सैनिक गमावत होता. याशिवाय रशियात उपस्थित असलेल्या तरुणांना लष्कराचं प्रशिक्षण देऊन युक्रेनमध्ये पाठवलं जात आहे. लोकसंख्येतील घट थांबविण्याचं पुतिन यांचं आवाहन पूर्ण करण्यासाठी देशातील अधिकारी असंख्य कल्पनांचा विचार करत आहेत.
> जोडप्यांना शारीरिक संबंधांसाठी प्रोत्साहित करण्यासाठी रात्री १० ते पहाटे २ दरम्यान इंटरनेट आणि वीज देखील बंद करणे.
> एखाद्या महिलेनं मुलाला जन्म दिला तर तिला प्रोत्साहन रक्कम देणे.
> घरात राहून मुलांचं संगोपन करणाऱ्या आणि घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम देणे. ही रक्कम पेन्शनचा हिशेब करतानाही ग्राह्य धरली जाणार आहे.
> जोडप्याला त्यांच्या पहिल्या डेटसाठी आर्थिक मदत देणे. यासाठी खर्चाची मर्यादा पाच हजार रूबल (सुमारे ४,३९५ रुपये) ठेवण्यात आली आहे.
> लग्नानंतरच्या हनिमूनच्या काही रात्रीचा संपूर्ण खर्च करण्याचाही सरकारचा विचार आहे. त्यासाठी २६३०० रूबल (२३१२२ रुपये) रुपयांच्या मर्यादेचा समावेश आहे.
> १८ ते २३ वयोगटातील मुलींना मुलाच्या जन्मावर ९०० पौंड (सुमारे ९७,३११ रुपये) देण्यावर विचार केला जात आहे. हे प्रमाण प्रत्येक शहरात वेगवेगळे असेल. याव्यतिरिक्त, महिलांना गर्भधारणेच्या चाचण्या विनामूल्य करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात २० हजार महिलांनी आधीच सहभाग घेतला आहे.
आरोग्यमंत्री डॉ. येवगेनी शेस्टोलोव्ह यांनी सांगितलं की, रशियन लोक कार्यालये आणि कारखान्यांमध्ये कॉफी आणि दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीदरम्यान लैंगिक संबंध ठेवू शकतात. मॉस्कोतील अधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांना सेक्स आणि मासिक पाळीबद्दल प्रश्न विचारणे आवश्यक आहे. कोणी उत्तर देण्यास नकार दिला तर त्यांना डॉक्टरांकडं जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महिला कर्मचाऱ्यांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी
१. तुम्ही कोणत्या वयात सेक्स करायला सुरुवात केली?
२. गर्भनिरोधक गोळ्या वापरता का?
३. तुम्हाला वंध्यत्वाचा त्रास आहे का?
४. तुम्ही किती वेळा गरोदर झाला आहात? झाला असाल तर किती वेळा?
५. तुम्हाला काही लैंगिक आजार आहे का?