एक वर्ष उलटून गेल्यानंतरही रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरूच आहे. चिमुकला युक्रेन चिवटपणे झुंज देत असल्यानं रशियाची दमछाक झाली आहे. रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्लेच सुरूच आहेत. हे युद्ध सुरू असताना वेगळीच बातमी समोर आली आहे. रशियनं सैन्यानं चुकून आपल्याच देशातील शहरावर बॉम्ब टाकल्याचं उघडकीस आल आहे. त्यामुळं रशियाचं मोठं नुकसान झालं आहे.
रशियाच्या लढाऊ विमानातील सैनिकांकडून गुरुवारी रात्री ही मोठी चूक झाली. युक्रेनला प्रत्युत्तर देताना रशियाच्या लढाऊ विमानानं आपल्याच देशातील बेल्गोरोड या शहरात बॉम्ब टाकला. हा बॉम्ब इतका मोठा होता की शहरात सुमारे ४० मीटर अंतरापर्यंतचा खड्डा पडला. जिथं बॉम्ब पडला त्या भागातील इमारतींचंही नुकसान झालं. एक कारही उद्ध्वस्त झाली. रशियन न्यूज एजन्सी TASS नं या घटनेला दुजोरा दिला आहे.
बेल्गोरोड हे शहर युक्रेनच्या उत्तरेकडील सीमेला लागून आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं एका एजन्सनीनं दिलेल्या माहितीनुसार, 'स्थानिक वेळेनुसार रात्री सव्वा दहाच्या सुमारास Su-34 लढाऊ विमान बेल्गोरोड शहरावरून जात होते. यावेळी चुकून हा बॉम्ब पडला.
'बॉम्बमुळे अनेक अपार्टमेंटमधील इमारतींचं नुकसान झालं आहे. स्फोटात दोन जण जखमीही झाले आहेत, अशी माहिती बेल्गोरोडचे महापौर व्हॅलेंटीन डेमिडोव्ह यांनी दिली.
रशियन लष्कराने गेल्या वर्षीच Su-34 लढाऊ विमानं आपल्या ताफ्यात समाविष्ट केली आहेत. ही लढाऊ विमान फारशी उपयुक्त ठरली नसल्याचं बोललं जात आहे. युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यापासून रशियाच्या ताफ्यातील एकूण Su-34 विमानांपैकी १० टक्के किंवा त्याहून अधिक नष्ट झाली आहेत.
नेदरलँडशी संबंधित ओरीक्स या गुप्तचर वेबसाइटनं केलेल्या दाव्यानुसार, युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यापासून रशियाकडील Su-34 प्रकारातील १९ लढाऊ विमानं नष्ट झाली आहेत. त्यामुळं रशियन बनावटीच्या शस्त्रास्त्रांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
संबंधित बातम्या