RSS Chief Mohan Bhagwat On Reservation : सध्या देशात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. एकीकडे भाजप विजयाची हॅट्टीक करण्यासाठी जंग जंग पछाडत आहे तर दुसरीकडे INDIA आघाडीने भाजप व आरएसएसकडून संविधान संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना आरएसएस प्रमुख भागवत म्हणाले की, संविधानाने काही गटांना दिलेल्या आरक्षणाला संघ परिवाराने कधीच विरोध केला नाही. इतकेच नाही तर आरक्षण आवश्यक असल्यास त्यामध्ये वाढ करावी, असे मत संघाचे आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आधीपासूनच संविधानानुसार दिलेल्या सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आला आहे. मात्र काही लोकांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. खोटे व्हिडिओ प्रसारित करुन संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरएसएस आरक्षणाच्या विरोधात असून आम्ही त्याबद्दल बोलत नाही, अशा आशयाचा व्हिडिओ प्रसारित केला जात आहे. मात्र हे पूर्णपणे खोटं आहे. संघ संविधानाने दिलेल्या सर्व गटांच्या आरक्षणांना पाठिंबा देते, अशी प्रतिक्रिया भागवत यांनी दिली आहे.
दरम्यान, अनेक पक्षांचे नेते भाजप आणि आरएएसवर आरक्षणव संविधानसंपवणार असल्याचा आरोप निवडणूक प्रचारात करत आहेत. आरक्षणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धादरम्यान मोहन भागवत यांचे वक्तव्य महत्वाचे आहे. सरसंघचालक भागवत यांनी गेल्या वर्षीही नागपुरात बोलताना आरक्षणावर भाष्य करताना म्हटलं होतं की, जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण चालूच राहिले पाहिजे.
अकोल्यातील प्रचार सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, भाजप संविधान संपवणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. तसे करायचे असते तर १० वर्षापूर्वीच केले असते. या देशातील जनतेने १० वर्षांपूर्वीच भारतीय जनता पार्टीला बहुमत दिले होते. त्याचा उपयोग भाजपने कलम ३७० हटविण्यासाठी, तिहेरी तलाक बंदीसाठी, दहशतवाद संपवण्यासाठी केला. मात्र, काँग्रेसकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.