मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हनुमान ध्वज हटवल्यामुळे कर्नाटकात तणाव; भाजपसह हिंदू संघटनांचे आंदोलन, कलम १४४ लागू

हनुमान ध्वज हटवल्यामुळे कर्नाटकात तणाव; भाजपसह हिंदू संघटनांचे आंदोलन, कलम १४४ लागू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 29, 2024 03:58 PM IST

Hanuman Flag Row : कर्नाटकमधील एका गावात हनुमान ध्वज हटवल्यावरून वाद निर्माण झाला असून गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यावरून भाजपकडून राज्यभर आंदोलने केली जात आहेत.

Hanuman Flag Row
Hanuman Flag Row

कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यात केरागोडु गावामध्ये हनुमान ध्वजावरून कमालीचा तनाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून गावात कलम १४४ लागू करण्यात आले असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा वाद गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. एका तरुण मंडळाने १०८ फूट उंचीच्या पोलवर हनुमानध्वज लावला होता. ग्रामपंचायतीने हा ध्वज लावण्यास परवानगी दिली होती. मात्र काही लोकांनी याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना हा ध्वज हटवण्यासंबंधी निवेदन दिले होते.

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे हनुमान ध्वज फडकवण्यात आला होता. यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीने येथे तिरंगा फडकावला आणि संध्याकाळी खाली उतरवला. त्यानंतर २७ जानेवारीला येथे पुन्हा हनुमान ध्वज फडकवल्यानंतर काही लोकांनी यावर आक्षेप घेत तक्रार दिली.

रविवारी या स्तंभावरून हनुमान ध्वज हटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आले होते. ध्वज उतरवताना गावातील लोक संतप्त झाले व त्यांनी प्रशासनाचा विरोध केला. यावेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करण्यात आला. यानंतर प्रशासनाने स्तंभावरील हनुमान ध्वज काढून तेथे तिरंगा फडकवला.

जिल्हा प्रशासनाच्या या कारवाई विरोधात गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भाजप, जेडीएससर सर्व विरोधी पक्ष या घटनेवरून सरकारविरोधात एकवटले आहेत. हनुमान ध्वज उतरवल्याच्या निषेधार्थ भाजपकडून राज्यभर निर्दशने करण्यात येत आहेत.

दरम्यान, ज्या ठिकाणी स्तंभ उभारला आहे, ती जागा सरकारी जमीन आहे. काही अटींसह तेथे स्तंभ उभारण्यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायतीला परवानगी दिली आहे. मात्र या स्तंभावर कोणत्याही प्रकारचा धार्मिक व राजकीय ध्वज न फटकावण्याची अट ठेवली आहे. येथे केवळ तिरंगा ध्वज फडकावता येतो, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

WhatsApp channel

विभाग