सध्या परीक्षांचा काळ सुरू असून अनेक अपघाताच्या घटनाही समोर येत आहेत. झारखंड राज्यातील धनबादमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. झरिया केसी गर्ल्स स्कूलच्या मुख्य गेटवर स्लॅबचा काही भाग कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. प्रिंस कुमार (१३) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना शनिवार दुपारी घडली. प्रिंस परीक्षा देण्यासाठी आला होता.
बाल्कनीचा स्लॅब कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला हा आवाज ऐकून आसपासचे लोक जमले. त्याने शिक्षकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्याला जवळच्या खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले. त्याची गंभीर स्थिती पाहून डॉक्टरांनी त्याला धनबादला पाठवले. धनबादमधील जालान रुग्णालयात उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, झरिया डीएवी विद्यालय अंचल झरियामधील विद्यार्थी प्रिंस कुमार याच्यासह आठवीतील विद्यार्थ्यांचा परीक्षेचा नंबर शनिवारी केसी गर्ल्स स्कूल सेंटरमध्ये पडला होता. दुपारी जेवणाच्या सुट्टीत सर्व विद्यार्थी शाळेतून बाहेर जात होते. त्यावेळी अचानक बाल्कनीचा काही भाग कोसळला. हा ढिगारा प्रिंसच्या अंगावर कोसळल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. केसी गर्ल्स स्कूल खूप जुनी शाळा आहे. १९३२ पासून ही शीळा सुरू आहे. अनेक वेळा याची दुरुस्ती करण्यात आली आहे. आता यामध्ये एका विद्यार्थ्याचा बळी गेला आहे.
मृत प्रिंसचे वडील प्रदीप साव यांनी शाळेच्या शिक्षकांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, शाळेची इमारत व बाल्कनी जर्जर असूनही विद्यार्थी शाळेत येत आहेत. यापूर्वी शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यावेळी कोणालाही दुखापत झाली नव्हती. दुसरीकडे विद्यार्थ्याचा मृतदेह त्याचे गाव झरिया येथे दाखल होताच लोक संतप्त झाले. त्यांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करत झरिया-धनबाद मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले.
संबंधित बातम्या