Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाट! मुख्यमंत्र्याच्या घरावर रॉकेट हल्ल्यानंतर गोळीबारात ५ ठार-rockets fired at first manipur cms house as conflict spirals ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाट! मुख्यमंत्र्याच्या घरावर रॉकेट हल्ल्यानंतर गोळीबारात ५ ठार

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाट! मुख्यमंत्र्याच्या घरावर रॉकेट हल्ल्यानंतर गोळीबारात ५ ठार

Sep 07, 2024 04:01 PM IST

Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. अतिरेक्यांनी मुख्यमंत्ऱ्यांच्या घरावर केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर झालेल्या गोळीबारात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कुकी आणि मेतेई या दोन्ही समुदायातील लोकांचा समावेश आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाट! मुख्यमंत्र्याच्या घरावर रॉकेट हल्ल्यानंतर गोळीबारात ५ ठार
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाट! मुख्यमंत्र्याच्या घरावर रॉकेट हल्ल्यानंतर गोळीबारात ५ ठार

Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. हा तणाव सध्या कमी होण्याची चिन्हे देखील दिसत नाहीत. बिष्णुपूरमध्ये आज भीषण रॉकेट हल्ल्यानंतर झालेल्या हिंसाचारात व गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एका व्यक्तीला झोपेत असताना गोळ्या घालून ठार करण्यात आले. तर त्यानंतर झालेल्या गोळीबारात चौघांना ठार करण्यात आले.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरचे माजी मुख्यमंत्री मैरेंबम कोइरेंग सिंह यांच्या मोईरांग शहरातील घरावर दुपारी साडेतीनच्या सुमारास रॉकेट डागण्यात आला. हे रॉकेट घराच्या आवारात आणि घरापासून काही अंतरावर कोसळले, ज्यात धार्मिक विधींची तयारी करत असलेल्या ७२ वर्षीय आरके राबेई सिंह यांचा मृत्यू झाला. १३ वर्षीय मुलीसह माजी मुख्यमंत्र्यांचे पाच नातेवाईक जखमी झाले. सिंह १९६३ ते १९६९ या तीन वेगवेगळ्या टर्ममध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री होते. १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले.

सिंह यांच्या निवासस्थानावर झालेला रॉकेट हल्ला हा दिवसातील दुसरा दिवस असून, शुक्रवारी पहाटे चार वाजता जिल्ह्यातील त्रोंगलोबी गावातील दोन इमारतींवर अशाच शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अतिरेक्यांनी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर एकट्या राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात घुसून त्याची गोळ्या झाडून हत्या केली. अधिकारी म्हणाले की, हत्येनंतर, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये लढाऊ समुदायांच्या सशस्त्र लोकांमध्ये जोरदार गोळीबार झाला, ज्यामध्ये तीन अतिरेक्यांसह चार सशस्त्र नागरिक ठार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात मृत्युमुखी पडलेले नागरिक हे कुकी आणि मेईतेई या दोन्ही समुदायाचे होते. मणिपूरमधील हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर गेल्या पाच दिवसांत तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिष्णुपूरमध्ये शुक्रवारी रात्री एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. याशिवाय २ मणिपूर रायफल्स आणि ७ मणिपूर रायफल्सच्या मुख्यालयातून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गेल्या १७ महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात पहिल्यांडा रॉकेट हल्ला आणि ड्रोन हल्ला करण्यात आला. कुकी अतिरेक्यांनी लांब पल्ल्याचे रॉकेटही डागल्याचे पोलिसांनी सांगितले. या रॉकेटची लांबी सुमारे चार फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शनिवारी राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूर गेल्या वर्षी ३ मे पासून जातीय हिंसाचारात होरपळत आहेत. अधिका-यांचे म्हणणे आहे की, दारुगोळा एका लांब पाईपमध्ये भरून रॉकेट लाँचरच्या साहाय्याने डागण्यात आले.

ड्रोन हल्ले म्हणजे 'दहशतवादी कृत्य : मुख्यमंत्री

मणीपुरमध्ये अलीकडे ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची तपासणी करण्यासाठी केंद्रसरकारने पोलिस, लष्कर आणि निमलष्करी दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती आता अहवाल तयार करत असून १३ सप्टेंबरपर्यंत हा अहवाल सादर केला जाणार आहे. मणिपूरचे पोलिस महासंचालक राजीव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या अतिरेक्यांनी तैनात केलेल्या ड्रोनची सखोल तपासणी आणि अभ्यास करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही स्फोटके गॅल्व्हेनाइज्ड लोखंडी (जीआय) पाईपमध्ये भरण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर स्फोटके असलेले जीआय पाईप देशी बनावटीच्या रॉकेट लाँचरमध्ये बसवून एकाच वेळी डागण्यात आले. सध्या तरी डोंगरावरील नेमकी जागा सांगता येत नाही, जिथून गोळीबार करण्यात आला, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Whats_app_banner
विभाग