driving license new rule : ड्रायव्हिंग लायसन्स काढू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीची प्रक्रिया सोपी केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया किचकट असल्याने देशात अनेकांना अडचणी येतात. ही प्रक्रिया सुलभ करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. वास्तविक, अर्जदारांना यासाठी अनेक फॉर्म भरावे लागतात आणि विविध अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो. ड्रायव्हिंग लायसन्सच्या या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे यंत्रणेतील भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढते, अशी टीका देखील होत होती. अशा परिस्थितीत आपल्या देशातील रस्ते सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याची टीका देखील केली जात होती.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अशा उणीवा दूर करण्यासाठी काही मोठी पावले उचलली आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यासंबंधीची प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात सुलभ करण्यात आली आहे. मंत्रालयाने भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. मात्र, १ जूनपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत...
१. अर्जदार आता त्यांच्या जवळच्या केंद्राला भेट देऊन ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकतात. १ जूनपासून त्यांना सध्याच्या नियमांनुसार संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची गरज भासणार नाही.
२. आता सरकार ज्या खाजगी क्षेत्रातील संस्थांना ड्रायव्हिंग चाचण्या घेण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे त्यांना प्रमाणपत्र देखील जारी करेल.
३. वैध परवान्याशिवाय वाहन चालवल्यास दंड अधिक कडक होईल. यामध्ये १,००० ते २,००० रुपयांपर्यंतच्या दंडाचा समावेश आहे.
४. एखादा अल्पवयीन वाहन चालवताना पकडला गेला तर त्याच्या पालकांवर कारवाई होऊ शकते. अशा स्थितीत २५ हजार रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच, वाहनाची नोंदणी रद्द केली जाईल.
५. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता मंत्रालय अर्जदारांना कोणत्या प्रकारच्या परवान्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील हे आधीच सांगेल.
६. देशभरातील रस्ते अधिक पर्यावरणपूरक बनविण्यावर भर दिला जाईल. यासाठी मंत्रालय ९ हजार जुनी सरकारी वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याचा आणि इतर वाहनांच्या कार्बन उत्सर्जन मानकांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे.
७. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (https://parivahan.gov.in) वेबसाइटला भेट देऊन अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
संबंधित बातम्या