मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जेलमध्ये पहिल्या रात्री सिद्धू जेवलेही नाहीत, कारण विचारलं असता म्हणाले…

जेलमध्ये पहिल्या रात्री सिद्धू जेवलेही नाहीत, कारण विचारलं असता म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 21, 2022 12:05 PM IST

एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा झालेले काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू शुक्रवारी न्यायालयापुढं शरण गेले. त्यानंतर त्यांना कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

नवजोत सिंग सिद्धू
नवजोत सिंग सिद्धू (PTI)

माजी क्रिकेटपटू व काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना ३४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात एका वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी त्यांना कोठडीत पाठवण्यात आलं. कोठडीत पहिल्या रात्री सिद्धू यांनी जेवण घेतलं नाही, अशी माहिती समोर आली आहे.

पार्किंगच्या वादातून १९८८ साली सिद्धू व त्यांच्या मित्राचा काही लोकांशी वाद झाला होता. यावेळी सिद्धू यांनी केलेल्या मारहाणीत गुरुनाम सिंह नामक एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. पुराव्याअभावी १९९९ मध्ये या प्रकरणातून सिद्धू यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. मात्र, पीडिताच्या कुटुंबीयांनी या निर्णयाला आव्हान दिलं होतं. पुढं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. तिथं सिद्धू यांना एका वर्षाची शिक्षा झाली आहे. शरण येण्यासाठी सिद्धू यांनी एक आठवड्याचा वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयानं त्यास नकार दिल्यानंतर काल कपड्यांनी भरलेली एक बॅग घेऊन ते शरण गेले. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. 

सिद्धू यांना पटियाला येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं असून त्यांचा कैदी नंबर २४१३८३ आहे. त्यांना बराक क्रमांक १० मध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या सोबत अन्य चार कैदी आहेत. शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंह मजिठिया देखील याच तुरुंगात आहेत. मात्र, ते वेगळ्या बराकमध्ये आहेत. 

तुरुंगात काल सिद्धू यांची पहिली रात्र होती. पहिल्या रात्री त्यांनी जेवण घेणं टाळलं. तुरुंग अधिकाऱ्यांनी जेवण न घेण्याचं कारण विचारलं असता मी आधीच जेवलो आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी काही औषधं मात्र घेतली, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिली. सिद्धू यांच्या जेवणासाठी तुरुंगात कुठलीही विशेष व्यवस्था नाही. इतर कैद्यांचंच जेवण त्यांना दिलं जाणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी काही पथ्यपाणी सांगितल्यास तुरुंगाच्या कँटिनमधून त्यांना ते जेवण घेता येणार आहे, असंही एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

सिद्धू यांना सक्तमजुरीची शिक्षा झाल्यानं तुरुंगात त्यांना नियमानुसार काम करावं लागणार आहे. त्यासाठी पहिले तीन महिने त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. नियमानुसार, कुशल कारागीर असलेल्या कैद्याला दिवसाला ६० रुपये आणि अकुशल कारागिराला दिवसाला ४० रुपये मिळतात. सिद्धू यांना त्यानुसारच कामाचा मोबदला मिळणार आहे.

IPL_Entry_Point