दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर हरियाणातील नूंह जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर नूंह पोलीस स्टेशन फिरोजपूर झिरका सीमेवरील इब्राहिमवास गावाजवळ आज सकाळी १० च्या सुमारास एका अनियंत्रित पिकअप वाहनाने ११ सफाई कामगारांना चिरडले. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे.
आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर सफाई कर्मचारी साफ सफाईचे काम करत होते. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने या कर्मचाऱ्यांना चिरडले. धडक इतकी भीषण होती की, सहा कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा झाला. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली. त्यानंतर पोलीस, रुग्णवाहिका आणि रस्ता सुरक्षा यंत्रणेची पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघाताचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. मृत कर्मचाऱ्यांचे तुकडे, अनेक मृतदेह महामार्गावर विखुरलेले होते.
अपघातानंतर पिकअपचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिस आणि स्थानिकांनी दिली. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तसेच एक्स्प्रेस वेवर ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, मृत आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत व्यक्ती कोणत्या कंत्राटदाराच्या हाताखाली काम करत होती, याचाही अद्याप उलगडा झालेला नाही. कंत्राटदार आल्यानंतर जखमी आणि मृतांची ओळख पटवली जाईल.
मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत. अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर बराच वेळ जाम झाला होता, तो उघडण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.
संबंधित बातम्या