पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्याची घोषणा करताच आधीच विखुरलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीला आणखी एक तडा गेला. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारत रत्न मिळताच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि आरएलडी यांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांनी स्वत: याला दुजोरा दिला आहे. त्यांनी एनडीएत सामील होण्याबाबतच्या प्रश्नावर म्हटले की, नकार देण्यासाठी आता काही कारण उरलेले नाही. मी कोणत्या तोंडाने त्यांना नकार देऊ.
वृत्त आहे की, आरएलडी व भाजपमध्येही जागावाटपावरही एकमत झाले आहे. रिपोर्टनुसार भाजपने जयंत चौधरी यांना बागपत आणि बिजनौर लोकसभा जागांची ऑफर दिली आहे. तसेच केंद्रात सरकार बनल्यानंतर मंत्रीपदाचा प्रस्तावही दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून RLD एनडीए आघाडीत जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच आज चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देण्याच्या घोषणेने त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
माध्यमांशी संवाद साधताना जयंत चौधरी म्हणाले की, आज देशासाठी खूप मोठा दिवस आहे. मी भावूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती मुर्मू यांचे आभार मानतो. देश त्यांचा आभारी आहे. पंतप्रधान मोदी देशाची नस अचूक ओळखतात. आज कमेरा समाज, शेतकरी आणि कामगारांचा सन्मान होत आहे. हे करण्याची क्षमता अन्य कुठल्याही सरकारमध्ये नव्हती. मला माझे वडील अजित सिंह यांची आठवण येते. मी किती जागा घेणार यापेक्षा मी कुठल्या तोंडाने नकार देणार आहे? असं म्हणत त्यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचे संकेत दिले.
सूत्रांनुसार, भाजपा आणि आरएलडी आघाडी निश्चित आहे. आरएलडी २ जागांवर निवडणूक लढेल. त्याशिवाय जयंत चौधरी यांच्या आरएलडीला राज्यसभेची एक जागा दिली जाईल.केंद्रात सत्ता आल्यास एक मंत्रीपदही देण्याची ऑफर आहे. या दोन्ही पक्षांच्या आघाडीची लवकरच घोषणा होईल.
संबंधित बातम्या