बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यावर मुंबईत अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तक्रारीनंतर बुधवारी मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ७६ वर्षीय लालू यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयात ब्लॉकेजची समस्या असल्याने डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला. मात्र, लालूंच्या तब्येतीची माहिती रुग्णालयाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
अँजिओप्लास्टीनंतर लालू यादव यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉक्टर संतोष डोरा आणि सुवर्णा टिळक यांनी यशस्वी अँजिओप्लास्टी केली. राजद प्रमुख मंगळवारी पाटणा हून मुंबईत दाखल झाले. त्यावेळी नियमित आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांना भेटणार असल्याचे लालूंकडून सांगण्यात आले होते.
१० वर्षांपूर्वी याच रुग्णालयात लालू यादव यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. २०१४ मध्ये, त्याच्याकडे महाधमनी व्हॉल्व्ह बदलला गेला. ही शस्त्रक्रिया सुमारे ६ तास चालली. त्यानंतर लालू यादव २०१८ आणि २०२३ मध्ये दोनदा पाठपुराव्यासाठी मुंबईला गेले होते.
लालू यादव गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या गंभीर समस्येने त्रस्त आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये सिंगापूरमध्ये त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर अनेक महिने ते घरीच राहिले होते. त्यावेळी ते सार्वजनिक व्यासपीठांपासून दूर राहिले. नुकतेच ते पत्नी राबडी देवी आणि मुलगी मीसा भारती यांच्यासोबत रुटीन चेकअपसाठी सिंगापूरला गेले होते.
देशात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील पक्ष सातत्याने जातनिहाय जनगनणा करण्याची मागणी करत आहेत. यावर लालू प्रसाद यादव यांनी नुकतीच मोठी प्रतिक्रिया दिली होती. भाजप व संघाचे कान पकडून, दंड बैठका करायला लावू आणि जातनिहाय जनगणना करुन घेऊ. यांची लायकी आहे का? जातनिहाय जनगणनेला नाही म्हणायची? यांच्यापुढे आम्ही काही पर्यायच ठेवणार नाही. दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि गरीब या सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची वेळ आता आली आहे. अशी पोस्ट लिहून लालूप्रसाद यादव भाजपव संघावर टीका केली होती.