Bangladesh Protests News : बांगलादेशात हिंसाचार सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. या सोबतच अवामी लीगच्या नेत्यांना देखील लक्ष्य केलं जात आहे. मंगळवारी तब्बल अवामी लीगच्या तब्बल २० नेत्यांची हत्या करण्यात आली. देशभरात अवामी लीग आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या किमान २० नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सापडले. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडल्यापासून सातखीरामध्ये हल्ले आणि हिंसाचारात किमान १० लोक ठार झाले आहेत. अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली.
कोमिल्ला येथे जमावाने केलेल्या हल्ल्यात ११ जण ठार झाले. अशोकतळा येथील माजी नगरसेवक मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला अज्ञातांनी आग लावल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी घरातून त्यांचे मृतदेह सापडले. यामध्ये पाच तरुणांचाही समावेश आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सोमवारी संतप्त जमावाने या भागातील शाह आलमच्या घरावर हल्ला केला. काही लोक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढले. दरम्यान, जमावाने घराच्या तळमजल्यावर आग लावली. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर आसरा घेत असलेले लोक धुरामुळे व आगीमुळे होरपळून मरण पावले. या घटनेत किमान १० जण जखमी झाले आहेत. यातील एका गंभीर जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
दरम्यान, नाटोर-२ (सदर आणि नळडांगा) मतदारसंघाचे खासदार शफीकुल इस्लाम शिमुल यांच्या घराला संतप्त जमावाने लावलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी खासदारांच्या ‘जन्नती पॅलेस’ या घरातील अनेक खोल्या, बाल्कनी आणि टेरेसमध्ये मृतदेह आढळून आले. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना यांच्या राजीनाम्याची बातमी समजताच संतप्त जमावाने खासदार शफीकुल यांच्या घराला आग लावली. त्यांच्या लहान भावाची घराशेजारी असलेली पाच मजली इमारत आणि खासदाराचे जुने घरही जाळण्यात आले तसेच त्यांची तिन्ही घरे लुटली.
फेणीमध्ये स्थानिक लोकांनी जुबा लीगच्या दोन नेत्यांचे मृतदेह बाहेर काढले. यापैकी जुबा लीगचा नेता मुशफिकुर रहीमचा मृतदेह सोनागाजी उपजिल्हामधील एका पुलाखाली सापडला. मुशफिकर झालिया युनियन जुबा लीगचे कार्यालय सचिव होते. फेनी सदर उपजिल्हामध्ये सकाळी आणखी एक जुबा लीग नेता बादशाह मिया याचा मृतदेह सापडला. लालमोनिरहाटमध्ये स्थानिक लोकांनी जिल्हा एएलचे संयुक्त महासचिव सुमन खान यांच्या घरातून सहा मृतदेह बाहेर काढले. सोमवारी जमावाने घर पेटवून दिले होते. बोगरा येथे जमावाने जुबा लीगच्या दोन नेत्यांची हत्या केली. ही घटना दीरखीपारा आणि शाहजहांपूर उपजिल्हामध्ये घडली.