Kolkata Trainee Doctor Crime Case : कोलकात्यात येथे आरजी कार मेदिल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी बंद देखील पुकारला आहे. आरोपीने ट्रेनी डॉक्टरची हत्या केल्यावर घरी गेला. काही वेळ शांत झोपून त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी कपडे धुतले. मात्र, त्याने शूज साफ करताना चूक केली. त्याच्या बुटावर रक्ताचे डाग आढळले. तसेच त्याचा ब्ल्यु टुथ देखील घटनास्थळी सापडला.
संजय रॉय असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा रूग्णालयातील कर्मचारी नव्हता. पण, तो सतत या रुग्णालयात येत होता. शुक्रवारी सकाळी प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. तिच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले की जेवल्यानंतर डॉक्टर काही वेळ विश्रांतीसाठी हॉलमध्ये गेले होते. या काळात रात्री ३ ते पहाटे ६ च्या दरम्यान ही घटना घडली.
या हायप्रोफाईल घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. बंगालशिवाय दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये डॉक्टर संपावर गेले आहेत. एम्स, सफदरजंगसारख्या मोठ्या रुग्णालयांमध्येही यामुळे रुग्णांची गैरसोय झाली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी सरकारने या प्रकरणी तातडीने पावले उचलली आहे. कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल रविवारी पुन्हा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा त्यांनी रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टरांची बैठक घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने ट्रेनी डॉक्टरचा खून करून तो घरी जाऊन झोपला.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, 'आरोपी घरी जाऊन झोपला. सकाळीच उठल्यानंतर त्याने त्याचे रक्ताने माखलेले कपडे धुतले. पण त्याच्या बुटावर डाग राहिले. तपासात त्याच्या बुटावर रक्त आढळले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पीडितेचे डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय शरीराच्या इतर भागांवरही जखमा होत्या. याशिवाय पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थितीजन्य पुराव्यांवरून डॉक्टरची आधी हत्या आणि नंतर बलात्कार झाल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिला अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आले. आरोपीनं डॉक्टरची हत्या करण्यापूर्वी मद्यपान केलं होतं. तसेच, गुन्हा घडला त्यादिवशी रात्री अकराच्या सुमारास तो दवाखान्याच्या मागे असलेल्या ठिकाणी दारू पित होता. जिथे त्यानं दारू पिऊन पोर्न व्हिडिओ पाहिले. त्याला असले व्हिडीओ पाहण्याची सवय होती.
vदरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर माझा अपमान होत आहे, जो मी सहन करू शकत नाही, असे ते म्हणाले. याशिवाय माझ्याबाबत राजकीय वक्तव्येही केली जात आहेत. माझी बदनामी केली जात आहे. मृत व्यक्तीही माझ्या मुलीसारखी होती. मी पण एक पालक आहे. मी आता राजीनामा देत आहे.