Republic Day Parade 2024 : भारतीय प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर सुरू आहे. पहाटेच्या कडक्याच्या थंडीत ही तयारी सुरू आहे. या संचलनात देशाचे लष्करी सामर्थ्य आणि विविधतेचे दर्शन घडते. दरवर्षी २६ जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार असून हा दिवस देशासाठी महत्वाचा आहे. भारताने २६ जानेवारी १९५० मध्ये नव्याने तयार केलेली राज्यघटना लागू केली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. याच दिवसांपासून २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व काय ? कर्तव्य पथावरूनच का संचलन केले जाते, या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे सर्वात महत्वाचे आकर्षण असते ते कर्तव्य पथावर होणारे लष्करी संचलन. या भव्य संचलन सोहळ्यात सशस्त्र दलांच्या क्षमतेचे प्रदर्शन घडवल्या जाते. यात भारतीय शस्त्रांचे प्रदर्शन, लष्करी क्षमता या सह अनेक चित्तथरारक कवायती देखील सादर केल्या जातात. यावर्षी, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या वर्षी स्त्री शक्तिचे महत्व हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य राहणार आहे.
कर्तव्य पथ (पूर्वीचा राजपथ) हा राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंतचा मुख्य रस्ता आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात या मार्गावर अनेक महत्वाच्या घटना घडल्या. ब्रिटिशांनी १९११ मध्ये कलकत्ता येथून राजधानी दिल्ली येथे हलवली. यानंतर येथे नवे शहर तयार करण्यात आले. दिल्ली शहरातील मध्यवर्ती असलेल्या या रस्त्याला सेरेमोनियल बुलेव्हर्डला म्हणजेच किंग्सवे या नावाने ओळखले जात असे. . स्वातंत्र्यानंतर या मार्गाचे नाव राजपथ ठेवण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यावर या मार्गावर पहिल्यांदा संचलन करण्यात आले. दरम्यान, २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तेव्हा पासून या मार्गावर हा संचलन सोहळा सुरू झाला. या दिवशी भारताच्या विविधतेचे आणि संस्कृतीचे आणि लष्करी सामर्थ्यांचे प्रदर्शन केले जाते. भारताच्या लोकशाहीचे, सार्वभौमतेचे हा सोहळा प्रतीक आहे.
भारत स्वतंत्र झाल्यावर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून लागू करण्यात आली. याच दिवशी भारत प्रजासत्ताक असल्याची घोषणा करण्यात आली. १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्यामुळे याच दिवशी संविधान स्वीकारण्यात आले.
सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एका बैठकीचे आयोजन केले होते. यात ब्रिटिशांनी २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यात यावा ही मागणी करण्यात आला. या दिवशी सर्वात पहिलं भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन २६ जानेवारीलाच साजरा केला जात होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिति तयार करण्यात आली. यात ३०८ सदस्य होते. हा मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ.भारतरत्न बाबासाहेब यांनी तयार केला. यात अनेक सुधारणा आणि बदल केल्यावर समितीच्या सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी २६ जानेवारी रोजी ही घटना सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. यानंतर १० वाजून २४ मिनिटांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या दिवशी, डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दिवशी, तिरंगा फडकावण्याबरोबरच, राष्ट्रगीत गाणे आणि भव्य लष्करी संचलन देखील केले जाते.
यावर्षी हा सोहळा ठीक १० वाजता सुरू होणार आहे. संचलन हे राष्ट्रपती भवनाजवळील रायसीना टेकडीपासून सुरू होते आणि कर्तव्य पथावरून पुढे जाते. इंडिया गेट पार करून लाल किल्ल्याकडे जाते. तब्बल पाच किलोमीटरहून अधिक अंतर कापले जाते. कार्यक्रमाच्या ठिकाणी बसण्याची क्षमता ७७,००० आहे, त्यापैकी ४२००० जागा या सर्वसामान्यांसाठी राखीव ठेवल्या जातात.
संबंधित बातम्या