Republic Day 2024 : स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. त्या निमित्तानं देशभरात अनेक कार्यक्रम होणार आहेत. प्रजासत्ताक दिनाचा प्रमुख सोहळा राजधानी दिल्लीत होत असून या सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर संचलनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सलामी देऊन संचलनाला हिरवा झेंडा दाखवला. 'आवाहन' ग्रुपच्या माध्यमातून १०० महिला कलाकारांनी विविध प्रकारची तालवाद्ये वाजवत संचलनात सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नॅशनल वॉर मेमोरियल’वर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. थोड्याच वेळात ते संचलन पाहण्यासाठी कर्तव्यपथावर पोहोचणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र प्रगतीपथावर आहेच, पण देशही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रगती करतोय. आर्थिक महासत्तेकडं जातोय. संपूर्ण जगात देशाचं नाव आदरानं घेतलं जातंय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी निघालेला भव्य मोर्चा काल रात्री नवी मुंबईत पोहोचला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरू आहे. हा मोर्चा आज मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. तत्पूर्वी, एपीएमसी मार्केटमध्ये जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जरांगे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांचा सेल्फी पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे की, ‘माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदी, भारतीय नागरिकांनो, प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासोबत असल्याचा आनंद आणि अभिमान आहे.’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं व सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रजासत्ताक दिन संचलनाचा सोहळा 'याचि देही, याचि डोळा' अनुभवण्यासाठी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सुरक्षा तपासणी करून लोकांना सोहळ्याच्या ठिकाणी सोडताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर त्यांनी पोस्ट केली आहे. 'देशातील आमच्या सर्व कुटुंबीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद!', असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
भारताला प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिकेनं शुभेच्छा दिल्या आहेत. भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा मित्र आहे. दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यंदा १०० हून अधिक महिला कलाकार सहभागी होणार आहेत. त्या शंख, नादस्वरम, नगारा अशी पारंपरिक वाद्ये वाजवताना दिसतील. तिन्ही सैन्य दलातील महिला जवानांच्या तुकड्याही मार्चपास्ट करताना दिसतील. तर, आठ महिला वैमानिक फ्लाय पास्टमध्ये सहभागी होतील. सीआरपीएफच्या तुकडीमध्ये केवळ महिला जवान दिसणार आहेत.
महिलांचे समूह संचलन, फ्रेंच तुकडीचा सहभाग, एआय, चांद्रयान -३ हे यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलानाचं मुख्य आकर्षण असेल.
प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी १०.३० वाजता नवी दिल्लीच्या विजय चौकातून सुरू होईल. ही परेड सुमारे ९० मिनिटे चालेल.
नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला अंदाजे ७७ हजार लोक उपस्थित राहणार आहेत. त्यात ४२ हजार मान्यवरांचा समावेश असेल.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता कर्तव्यपथावर राष्ट्रध्वज फडकावला जाणार. 'विकसित भारत' आणि 'लोकतंत्र की मातृका' अशी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज. राजधानी दिल्लीतील ध्वजवंदन व संचलनाची तयारी पूर्ण
संबंधित बातम्या