विद्यार्थिनीचा विनयभंग करून गायब झालेले प्रसिद्ध गायक संजय चक्रवर्ती यांना मुंबईतून अटक, दोन महिने सुरू होता शोध
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विद्यार्थिनीचा विनयभंग करून गायब झालेले प्रसिद्ध गायक संजय चक्रवर्ती यांना मुंबईतून अटक, दोन महिने सुरू होता शोध

विद्यार्थिनीचा विनयभंग करून गायब झालेले प्रसिद्ध गायक संजय चक्रवर्ती यांना मुंबईतून अटक, दोन महिने सुरू होता शोध

Nov 15, 2024 01:31 PM IST

Sanjay Chakraborty arrested : पंडित अजय चक्रवर्ती यांचा भाऊ संजय चक्रवर्ती यांना तब्बल दोन महिन्यांच्या शोधानंतर मुंबईत अटक करण्यात आली.

विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायक संजय चक्रवर्ती यांना अटक
विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायक संजय चक्रवर्ती यांना अटक

Sanjay Chakraborty arrested : स्वत:च्याच संस्थेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध गायक आणि संगीतकार संजय चक्रवर्ती यांना कोलकाता पोलिसांनी  शुक्रवारी मुंबईतून अटक केली. तब्बल दोन महिने पोलीस त्यांच्या मागावर होते.

संजय हे प्रख्यात शास्त्रीय गायक अजय चक्रवर्ती यांचे बंधू आहेत. चारू मार्केट पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून ट्रान्झिट रिमांडवर आणल्यानंतर न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय चक्रवर्ती यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात कोलकात्यातील योग संस्थेत संजय चक्रवर्ती यांनी एका १५ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. तक्रारीनुसार, संगीताचा वर्ग संपल्यानंतर संजय चक्रवर्ती तिथंच थांबले आणि इतर सर्व विद्यार्थी निघून गेल्यावर त्यांनी पीडित मुलीचा विनयभंग केला.

पीडित मुलीला तिच्या पालकांनी मानसिक उपचारासाठी बेंगळुरूला नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. उपचारादरम्यान पीडितेनं हा सगळा प्रकार पहिल्यांदा डॉक्टरांना सांगितला आणि तिच्या आई-वडिलांना याची माहिती मिळाली.

सप्टेंबर महिन्यात उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बेलघरिया पोलिस ठाण्यात पालकांनी ईमेलद्वारे तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केला.

ही घटना त्यांच्या कार्यक्षेत्रात घडल्यानं हे प्रकरण तपासासाठी चारू मार्केट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलं. ज्या संस्थेत हा गुन्हा घडला, त्या संस्थेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचं आणि त्यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि इतरांशी बोलण्याची पोलिसांची योजना आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर