
Haryana Violence News Updates : नूह जिल्ह्यात धार्मिक शोभायात्रेत दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर हरयाणातील अनेक ठिकाणी धार्मिक हिंसाचार सुरू असल्याची माहिती आहे. नूह, गुरुग्राम आणि मेवातमधील अनेक ठिकाणी दोन गटांमध्ये तुफान संघर्ष होत असून त्यात आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुरुग्राममध्ये जमावाने एका मशिदीला आग लावून तेथील इमामाची हत्या केल्याची घटना देखील समोर आली आहे. त्यामुळं गुरुग्राममध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आता हरयाणातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. राज्यातील अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला असून दोन्ही गटातील समित्यांची संयुक्त बैठका बोलावण्यात आल्या आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी हरयाणातील नूह जिल्ह्यामध्ये धार्मिक शोभायात्रेत दगडफेक झाल्याच्या घटनेवरून दोन गटात हिंसाचार उसळला होता. त्यात चार लोकांना प्राण गमवावा लागला होता, त्यात दोन होमगार्ड्सचा समावेश होता. याशिवाय गुरुग्राम येथील हिंसाचारात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर आता हल्लेखोर आणि दंगेखोरांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी म्हटलं आहे. हिंसाचारांच्या घटनांमध्ये आतापर्यंत १० पोलीस जखमी झाले आहे. पोलिसांनी २७ दंगेखोरांना अटक केली असून अद्याप अनेक आरोपी फरार आहे. किमान १२० वाहनांची नासधूस करण्यात आली असून त्यापैकी ५० वाहने पेटवून देण्यात आल्याची माहिती आहे.
गुरुग्रामसह हरयाणातील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने दंगलग्रस्त भागांमध्ये पोलीस आणि निमलष्करी दलं तैनात केली आहे. सोहना, नूह आणि गुरुग्राममध्ये पोलिसांनी ध्वजसंचलन केलं असून धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहे.
शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मंगळवारी नुह आणि सोहना येथे हिंदू आणि मुस्लीम समुदायाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली. यावेळी शांतता राखण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दोन्ही बाजूंनी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नुह आणि सोहना येथे हिंदू आणि मुस्लीम समाजाच्या जेष्ठ व्यक्तींच्या बैठका बोलावण्यात आल्या असून त्यात दोन्ही समाजाकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय आरोपींना सोडलं जाणार नसल्याचं हरयाणा पोलिसांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या
