रिलायन्स जिओने 4G फोन ‘जियो भारत V2’ लाँच केला आहे. ‘जिओ भारत V2’ खूपच कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. कंपनीने याची किंमत ९९९ ठेवली आहे. या फोनच्या माध्यमातून कंपनीने भारतातील जवळपास २५ कोटी २G ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. हे ग्राहक अजूनही एअरटेल व व्होडाफोन-आयडिया सारख्या कंपन्याचे वापरकर्ते होते. रिलायन्स जिओ केवळ 4G आणि 5G नेटवर्कवरच ऑपरेट करतो. रिलायन्स जिओचा दावा आहे की, ‘जिओ भारत V2’ च्या माध्यमातून कंपनी १० कोटी ग्राहक आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होईल.
बाजारात सध्या उपलब्ध इंटरनेटवर काम करणारे जितके फोन आहेत, त्यामध्ये 'जिओ भारत V2' ची किंमत सर्वात कमी आहे. ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध 'जिओ भारत V2' चा मासिक प्लॅनही सर्वात स्वस्त आहे. ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह १२३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दुसरीकडे अन्य ऑपरेटर व्हॉईस कॉल आणि २ जीबी डेटा असणाऱ्या मासिक प्लानची सुरुवातच १७९ रुपयांपासून होते. त्याचबरोबर ‘जिओ भारत V2’ च्या ग्राहकांना कंपनी १४ जीबी म्हणजे प्रतिदिन अर्धा जीबी ४ जी डेटा देईल, जे प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या २ जीबी डेटाहून ७ पट अधिक आहे. ‘जिओ भारत V2’ वर वार्षिक प्लानही उपलब्ध आहे. त्यासाठी ग्राहकांना १२३४ रुपये द्यावे लागतील.
रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच २G फ्री सेवा भारतात आणण्याचे संकेत दिले होते. कंपनीने २५ कोटी २G ग्राहकांना ४G मध्ये आणण्यासाठी ' जिओ भारत' प्लेटफॉर्म लाँच केला आहे. या प्लेटफॉर्मचा वापर दुसऱ्या कंपन्याही 4G फोन बनवण्यासाठी करू शकतील. कार्बन कंपनीने याचा वापर सुरू केला आहे. तज्ञ आशा करत आहेत की, २G फीचर फोनची जागा लवकरच ४G भारत सीरीजचे मोबाईल घेतील.
२ जी ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी कंपनीने २०१८ मध्ये जिओ फोन बाजारात आणला होता. जिओफोन आज १३ कोटी ग्राहकांची पसंत बनला आहे. ' जिओ भारत V2' कडूनही कंपनीला अशीच अपेक्षा आहे. कंपनीने ७ जुलैपासून 'जिओ भारत V2' ची बीटा ट्रायल सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे नियोजन 'जिओ भारत V2' देशातील ६,५०० तालुक्यांपर्यंत पोहोचवण्याचे आहे.
देशात निर्मित आणि केवळ ७१ ग्रॅम वजनाचा जिओ भारत V2' 4G वर काम करतो. यामध्ये एचडी व्हॉयस कॉलिंग, एफएम रेडियो, १२८ जीबी एसडी मेमरी कार्ड सपोर्ट सारखे फीचर्स आहेत. मोबाइलमध्ये ४.५ सेंमी. टीएफटी स्क्रीन, ०.३ मेगापिक्सेलकॅमेरा, १००० mAh ची बॅटरी, ३.५ mm चे हेडफोन जॅक, पावरफुल लाउडस्पीकर आणि टार्च मिळतो.
Jio Bharat V2 मोबाइल ग्राहकांना जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शन सोबतच जिओ -सावनच्या ८ कोटी गाण्यांचा मोफत एक्सेस मिळणार आहे. ग्राहक जिओ-पे च्या माध्यमातून यूपीआय व्यवहार करू शकतात. ग्राहक 'जिओ भारत V2' मध्ये आपल्या मातृभाषेत काम करू शकतो. मोबाईल २२ भारतीय भाषांमध्ये काम करू शकतो.
संबंधित बातम्या