श्वानप्रेमींना भुर्दंड.. ‘या’ शहरात कुत्र्यांच्या नोंदणी शुल्कात दुप्पटीने वाढ
तुम्हाला कुत्रा पाळण्याचा छंद जोपासायचा असल्यास त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. लखनौ महानगरपालिकेने कुत्रा पाळण्याचा कर दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवाबांचे शहर संबोधल्या जाणाऱ्या लखनौमध्ये जर तुम्हाला कुत्रा पाळण्याचा छंद जोपासायचा असल्यास त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. त्याचे असे आहे की, लखनौ महानगरपालिकेने कुत्रा पाळण्याचा कर दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ महानगर पालिकेने कुत्र्यांचे रजिस्ट्रेशन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
लखनौ महानगर पालिकेच्या कार्यकारिणी बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर रजिस्ट्रेशन शुल्क वाढवण्यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले जाईल. सध्या लखनौ महानगरपालिकेत पाळतू कुत्र्यांसाठी २००, ३०० व ५०० रुपये शुल्क आकारते. विदेशी जातीच्या कुत्र्यांसाठी ५०० रुपये, छोट्या ब्रीडच्या कुत्र्यांसाठी ३०० तर देशी कुत्र्यांसाठी २०० रुपये रजिस्ट्रेशन शुल्क आकारले जाते.
शुल्क वाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास विदेशी जातीच्या कुत्र्यांच्या नोंदणीसाठी एक हजार रुपये भरावे लागतील. कुत्र्यांच्या रजिस्ट्रेशन शुल्क वाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास याचा महापालिकेला मोठा फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील केवळ पाच हजार लोकांनीच आपल्याकडील पाळतू कुत्र्यांची नोंदणी केली आहे. जर महापालिकेने हा प्रस्ताव मंजूर केल्यास महापालिकेला प्रतिवर्ष ५० लाखाचा महसूल मिळेल. दरम्यान ज्या लोकांनी या वर्षी आपल्या कुत्र्यांची नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांना पुढच्या वर्षीपासून नव्या दराने नोंदणी शुल्क द्यावे लागेल.
लखनौ महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार जवळपास २५ हजार कुटूंबांकडे पाळतू कुत्रे आहेत. त्यापैकी केवळ २० टक्के लोकांनी नोंदणी केलेली आहे. कुत्र्यांची नोंदणी न करणाऱ्या लोकांना दंड करण्यासाठी महापालिकेकडून १५ ऑगस्टपासून तपासणी अभियानही राबवले जाणार आहे.