RBI: आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे एचएसबीसी बँकेला भरावा लागला लाखोंचा दंड
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  RBI: आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे एचएसबीसी बँकेला भरावा लागला लाखोंचा दंड

RBI: आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे एचएसबीसी बँकेला भरावा लागला लाखोंचा दंड

Jun 28, 2024 10:08 PM IST

RBI Imposes Penalty on HSBC Bank: आरबीआयने बँकांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि को-ब्रँडेड प्रीपेड कार्डव्यवहारांबाबत जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल एचएसबीसीला दंड ठोठावला.

आरबीआयने एचएसबीसीला दंड ठोठावला आहे.
आरबीआयने एचएसबीसीला दंड ठोठावला आहे.

HSBC Bank Penalty News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (Hongkong and Shanghai Banking Corporation Limited) यांना २९.६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बँकांच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि को-ब्रँडेड प्रीपेड कार्डव्यवहारांबाबत आरबीआयने जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल एचएसबीसीला दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेने ३१ मार्च २०२२ रोजी आपल्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात पर्यवेक्षी मूल्यांकनासाठी वैधानिक तपासणी (ISE 2022) केली होती. आरबीआयच्या सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यासंदर्भातील संबंधित पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली. बँकेने कारणे दाखवा आणि या निर्देशांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल दंड का आकारला जाऊ नये? अशी विचारणा केली.

आरबीआयने म्हटले आहे की, नोटीसला बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक उपस्थितीदरम्यान दिलेली तोंडी उत्तरे आणि अतिरिक्त माहिती पाहिल्यानंतर असे आढळले की, इतर गोष्टींबरोबरच बँकेवरील आरोप सिद्ध झाले आहेत. ज्यामुळे आर्थिक दंड आकारण्याची आवश्यकता आहे. निवेदनात म्हटले आहे की, काही क्रेडिट कार्ड खात्यांमध्ये देय असलेल्या किमान देयकाची गणना करताना नकारात्मक अमोर्टायझेशन होणार नाही, याची खात्री करण्यात बँक अपयशी ठरली.

मात्र, हा दंड वैधानिक आणि नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर निर्णय घेण्याचा हेतू नाही. शिवाय, आर्थिक दंड आकारल्याने रिझर्व्ह बँकेने बँकेवर सुरू केलेल्या पुढील कोणत्याही कारवाईवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर