केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंग बिट्टू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना त्यांना देशातील एक नंबरचे दहशतवादी म्हटले आहे. विरोधी पक्षनेत्यावर टीका करताना बिट्टू म्हणाले की, राहुल गांधी यांनी शीखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शीख कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत, पण त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी हे देशातील नंबर वन दहशतवादी आहेत. जे लोक नेहमी मारण्याच्या गप्पा मारतात, जहाजे आणि रेल्वे उडवून देण्याची भाषा करतात... ते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही अंदाज लावू शकता. माझ्या मते जर कुणाला पकडल्याबद्दल बक्षीस द्यायचे असेल तर ते राहुल गांधी आहेत.राहुल गांधी हे देशाचे सर्वात मोठे शत्रू असल्याचेही बिट्टू यांनी म्हटले आहे.
रवनीत सिंग बिट्टू म्हणाले, 'राहुल गांधी भारतीय नाहीत, त्यांनी आपला बहुतांश वेळ बाहेर घालवला आहे. परदेशात जाऊन सर्व काही चुकीचे बोलतात म्हणून त्यांना आपल्या देशावर फारसे प्रेम नाही. जे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, फुटीरतावादी, बॉम्ब, बंदुका आणि स्फोटके बनवण्यात माहिर आहेत, त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच संसदेतील विरोधी पक्षनेते झाले आहेत. कधी ते शीखांच्या असुरक्षिततेबद्दल बोलतात तर कधी समाजाच्या विघटनाबद्दल बोलतात. त्यांचे असे वर्तन माफ करण्यालायक नाही.
बिट्टू म्हणाले की, राहुल गांधी यांना गांभीर्य नाही. राहुल गांधी असोत वा त्यांच्या पक्षाचे इतर नेते, सगळेच देश तोडण्यात गुंतले आहेत. काँग्रेसला देशाच्या सुरक्षेची आणि कोट्यवधी लोकांच्या हिताची अजिबात चिंता नाही. केवळ मतांसाठी काँग्रेस समाजात अशांतता पसरवण्यात गुंतली आहे. मी काँग्रेसला खूप जवळून पाहिले आणि तपासले आहे. मी काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा खासदार झालो आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि भाजपच्या मूलभूत तत्वांनी प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये सामील होऊन मी रेल्वेच्या क्षेत्रात देशवासीयांची सेवा करत आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. भागलपूरमध्ये रविवारी पत्रकारांशी बोलताना बिट्टू म्हणाले की, देशवासियांचा पंतप्रधान मोदींवर पूर्ण विश्वास आहे आणि आज याच विश्वासामुळे ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वात देश वेगाने पुढे जात आहे. रेल्वेसह प्रत्येक क्षेत्रात विकासाचे नवे आयाम प्रस्थापित होत आहेत. तरीही काँग्रेस नेते त्यांच्यावर टीका करत आहेत.
राहुल गांधी यांनी सोमवारी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय-अमेरिकन मेळाव्याला संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही धर्म, भाषा आणि समुदायांना इतरांपेक्षा हीन समजतो. भारतात लढाई राजकारणासाठी नाही, तर या गोष्टीसाठी आहे. भारतात यासाठी लढाई सुरू आहे की, शिखांना पगडी किंवा कडा घालण्याचा अधिकार आहे की नाही, शीख म्हणून तो गुरुद्वारात जाऊ शकतो की नाही. यासाठीच हा लढा आहे आणि तो केवळ त्यांच्यासाठी नाही तर सर्व धर्मियांसाठी आहे.